काही दिवसांपासून पावसाने उडीप दिली आहे, मात्र आज मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही भागात ढगाळ स्थिती आहे. यामुळे आज धुळे , जळगाव, नाशिक, सातारा, सांगली, मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, हिंगोली, लातूर, जिल्ह्यातील काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान उत्तर भारतातून परतीचा पाऊस सुरू झाल्याने राज्यातील अनेक भागात उन्हाचा चटका वाढला आहे.
कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र व मराठावाड्यात सकाळपासून उन्हाचा पारात वाढत आहे. त्यामुळे कमाल तापामानात वाढ होऊल लागली आहे. विदर्भातील ब्रम्हपुरी येथे ३४.८ अंश सेल्सिअस एवढे कमाल तापमान नोंदविले गेले. त्याबरोबर पुण्यातही उन्हाचा पारा वाढत असून उकाड्यात वाढ होत असल्याची स्थिती आहे. पुण्यात जवळपास ३०.८ अंश सेल्सिअस एवढे कमाल तापमान नोंदविले गेले. त्याचबरोबर पावसाने उघडीप दिली, यामुळे हवेत गारवा राहिला. गारवा असल्याने तापमानात काहीशी घट होऊ लागली आहे. महाबळेश्वर येथे १५.६ अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे.
सध्या राज्यात पाऊस थांबला आहे. त्यामुळे शेतीकामांनाही वेग आला आहे. मराठवाडा व मध्य महाराष्ट्र, कोकणात वाफसा नसल्याने अजूनही शेतीकामे खोळंबल्याची स्थिती आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत कोकणात तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला, तर मध्य महाराष्ट्रात गगनबावडा, तळोदा, लोणावळा, येथे तुरळक सरी बरसल्या. तर मराठावाड्यात ऊन पडल्याने शेतातील वाफसा कमी होऊ लागला आहे. पश्चिम विदर्भात पाऊस नसला तरी पूर्व भागातील काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या.
Published on: 30 September 2020, 09:22 IST