News

कमी दाबाचे क्षेत्र विरल्यामुळे सध्या राज्यात सर्वच ठिकाणी जोरदार पावसाने विश्रांती घेतली असली, तरी एक-दोन दिवसांनंतर राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

Updated on 03 September, 2020 8:43 AM IST


कमी दाबाचे क्षेत्र विरल्यामुळे सध्या राज्यात सर्वच ठिकाणी जोरदार पावसाने विश्रांती घेतली असली, तरी एक-दोन दिवसांनंतर राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.  बंगालचा उपसागर आणि दक्षिण आंध्रप्रदेश व उत्तर तमिळनाडू परिसरात काही प्रमाणात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.  त्यामुळे राज्यात अधूनमधून ढगाळ हवामान राहिल. तसेच तुरळक ठिकाणी हलका पाऊस होईल.  प्रामुख्याने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात काही ठिकाणी पावसाची हजेरी असणार आहे.

राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर ओसरला आहे.  अनेक ठिकाणी ढगाळ हवामान आहे. त्यामुळे काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहेत.  दरम्यान बुधवारी सकाळपर्यंत भिरा येथे सर्वाधिक ६२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.  ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. रत्नागिरी, सिंधुदुर्ग दिल्ह्यात काही अशी ढगाळ हवामान होते.
ऑगस्ट महिन्यामध्ये मराठवाडय़ातील काही भाग वगळता राज्यात सर्वच ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली.  कोकणासह मध्य महाराष्ट्रातील घाटक्षेत्रामध्ये प्रामुख्याने मोठा पाऊस नोंदविला गेला.  ऑगस्टच्या शेवटच्या टप्प्यात पूर्व विदर्भात पावसाने धुमाकूळ घातला.  त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे.  संपूर्ण महिन्यातील पावसामुळे राज्यातील पाणीसाठय़ांमध्ये मात्र समाधानकारक वाढ झाली.  सध्या राज्यातील सर्व धरणांमधील एकूण पाणीसाठा ७८ टक्क्य़ांच्या आसपास आहे.

दरम्यान , ३ सप्टेंबरला कोकणसह राज्यात काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. ३ ते ६ सप्टेंबर या कालावधीत प्रामुख्याने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, औरंगाबाद आदी जिल्ह्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.  ४ सप्टेंबरला कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार असल्याची शक्यता आहे.  दिनांक ५ सप्टेंबरला कोकण, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होणार आहे.  तर ६ सप्टेंबरला मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार, तर मराठवाडय़ात काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

राज्याच्या बहुतांश भागांमध्ये ऑगस्टच्या शेवटच्या आठवडय़ात पावसाचा जोर कमी झाला आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून काही ठिकाणी पावसानी पूर्ण विश्रांती घेतली. मात्र, पुन्हा समुद्रावरून वारे वाहू लागल्याने राज्यात काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये कोकणात काही ठिकाणी आणि घाटविभागांमध्ये पावसाची नोंद झाली.

English Summary: Chance of light rain in some parts of the state with cloudy weather
Published on: 03 September 2020, 08:42 IST