विदर्भ ते पूर्व उत्तर प्रदेशाच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा आहे. तसेच महाराष्ट्राची उत्तर किनारपट्टी ते उत्तर केरळ दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. यामुळे राज्यात ठिकठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. आज आणि उद्या मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस होणार असल्याची शक्यता आहे. तर अनेक ठिकाणी सकाळपासून ऊन पडले आहे. दरम्यान सोमवारपासून मध्य महाराष्ट्र,कोकण, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पुणे परिसरातही ढगाळ हवामानासह अधूनमधून हलक्या ते मधून स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवली आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून अरबी समुद्राचा पूर्वमध्य परिसर व कर्नाटकाची किनारपट्टी दरम्यान चक्रवाताची स्थिती आहे. बंगालचा उपसागराच्या पश्चिमेमध्ये आणि आंध्रप्रदेश या भागात कमी दाबाचे क्षेत्र रविवारी तयार होण्याची शक्यता आहे. तर पश्चिम बंगालच्या परिसरात समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर चक्रकार वाऱ्याची स्थिती आहे.
त्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण होत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागात ढगाळ हवामान तयार होत आहे. सोमवारपासून मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा व विदर्भात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडेल. दरम्यान काल मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही ठिकाणी पाऊस झाला. या पावसामुळे अनेक ठिकाणी पिके आडवी झाली आहेत. मध्य महाराष्ट्रातील नगर, कोल्हापूर, नाशिक, पुणे, सातारा, जिल्ह्यातील काही भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.
Published on: 12 September 2020, 10:31 IST