News

पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ, कोकणात पाऊस पडण्याचा अंदाज आहे. दरम्यान यंदा नैऋत्य माेसमी पाऊस वेळेआधी देशात दाखल होण्याची शक्यता बुधवारी भारतीय हवामान विभागाने वर्तवली.

Updated on 14 May, 2020 1:23 PM IST

 

पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ, कोकणात पाऊस पडण्याचा अंदाज आहे. दरम्यान यंदा नैऋत्य माेसमी पाऊस वेळेआधी देशात दाखल होण्याची शक्यता बुधवारी भारतीय हवामान विभागाने वर्तवली. हवामान विभागानुसार बंगालच्या उपसागरात दक्षिण अंदमान समुद्रात बुधवारी सकाळी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. मान्सून १५ मे रोजी बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागातून श्रीलंकेत दाखल होईल. १६ मेच्या सायंकाळपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र अंफन या चक्रीवादळात रूपांतरित होऊन नैऋत्य बंगालच्या उपसागरात येईल.

हवामान विभागानुसार, अंदमान-निकोबार बेटांवर १५ आणि १६ मे रोजी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. याच काळात प्रतितास ४५ ते ५५ किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. १७ मे रोजी वाऱ्याचा वेग प्रतितास ८५ किमीपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान तापमानातही वाढ होत असून चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बुधवारी सकळपर्यंत २४ तासांमध्ये उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव येथे राज्यातील उच्चांकी ४३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्याच्या विविध भागात पूर्वमोसमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे कमाल तापमानात चढ- उतार होत आहे.

बुधवारी विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह राज्यात उन्हाचा चटका पुन्हा वाढला. मालेगवासह जळगाव, अकोल्यात तापमानाचा पारा ४३ अंशांच्या पुढे गेला होता.
दरम्यान देशाच्या इतर राज्यातही पावसाचा अंदाज आहे. पुढील २४ तासात जम्मू- काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. याशिवाय लदाख, आणि उत्तराखंडच्या काही ठिकाणी पाऊस पडू शकतो. पंजाबमधील काही भागातही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

English Summary: Chance of heavy rains in North Maharashtra including Vidarbha
Published on: 14 May 2020, 01:21 IST