गेल्या चार पाच दिवसापासून अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्राकार वाऱ्याची स्थिती अजूनही कायम आहे. त्यामुळे आज पुन्हा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकण व घाटमाध्यावर पावसाचा जोर कायम राहणार असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या सुत्रांनी वर्तविला आहे. मध्य प्रदेशाच्या नैत्रऋ भागात कमी दाबाचे क्षेत्र आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ३.६ किलोमीटर उंचीव आहे. तसेच कोकणच्या उत्तर भागात चक्राकार उत्तर भागात वाऱ्याची स्थिती आहे.
बंगालचा उपसागर ते मध्य प्रदेशाचा परिसर , जबलपूर, कोर्बा या भागात मॉन्सूनचा आस असलेला पट्टा कार्यरत आहे. हा पट्टा समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे. त्यामिळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. येत्या चार ते पाच दिवस कोकणातील अनेक भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच घाटमाथ्यावरही अतिवृष्टी होणार असून मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम पट्ट्यातील पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक जिल्ह्यातील बहुतांश भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे.
देशातील इतर राज्यातही जोरदार पाऊस होत आहे. आसाम, उत्तराखंड मध्ये मुसळधार पाऊस होणार असून हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. दरम्यान राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी पावसाने काहीशी उसंत घेतली असली तरी धरणातील विसर्ग सुरू असल्याने पंचगंगा नदी धोका पातळीवरून वाहत आहे. कोल्हापूर शहराच्या काही भागांमध्ये पाणी घुसले आहे. प्रशासनाने लोकांचे स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेले पाच दिवस मुसळधार पाऊस झाला. पाणलोट क्षेत्रात झालेल्या तुफानी पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. राधानगरी धरण काल संध्याकाळी भरल्यानंतर दोन दरवाजे उघडण्यात आले होते तर शुक्रवारी आणखी दोन दरवाजे उघडण्यात आले.
Published on: 08 August 2020, 08:02 IST