राज्यात मॉन्सूनचा पाऊस सक्रिय झाल्याने अनेक ठिकाणी हलक्या ते जोरदार सरी पडत आहेत. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकल्याने राज्यात पावसाला पोषक हवामान झाले आहे. अरबी समुद्रासह राज्यात ढगांची दाटी झाली आहे. आज राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिकमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. मराठावाड्यातही पावसाची रिपरीप सुरुच आहे. विदर्भातील तुरळक ठिकाणी मध्यम पावसाच्या सरी पडल्या. या पावसामुळे नद्या, नाले वाहत आहेत, तर धरणांच्या पाणी पातळीतही वाढ होऊ लागली आहे. या पावसाने पेरणी झालेल्यांना पिकांना दिलासा मिळाला आहे. धुळे जिल्ह्यातील नंदाळे बुद्रक येथे ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी झाली यामुळे साप नाल्याला मोठा पूर आला व पुराचे पाणी गावात शिरले. तसेच गावातील सुमारे दीडशे एकर शेती शिवारातही पाणी शिरल्याने पिकांसह शेतजमिनीचे प्रचंड नुकसान झाले. याचा ८० ते ९० शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
जळगाव जिल्ह्यातील बोरी धरणातील पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने बोरी धरण ८३ टक्के भरले. नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात प्रामुख्याने नांदगाव व मालेगाव तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने पिकांना जीवनदान मिळाले आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचल्याने दिसून आले. तर येवल्याच्या पूर्व भागातही रविवारी काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. तर मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. पुणे जिल्ह्यातील बहुतांशी भागात मुसळधार पाऊस पडत आहे. शिरुर, दौड, इंदापूर, बारामती भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत पुणे जिल्ह्यातील पूर्व भागात जोरदार पाऊश झाला.
Published on: 30 June 2020, 10:27 IST