गेल्या तीन ते चार दिवसांपासून उत्तर महाराष्ट्राची किनारपट्टी ते उत्तर केरळ दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. पुढील तीन ते चार दिवस ही स्थिती कायम राहणार आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसासाठी पोषक स्थिती तयार होत आहे. आज कोकण आणि विदर्भातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होईल असा अंदाज आहे. तर उद्यापासून राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
अरबी समुद्राच्या पूर्वमध्य परिसर व कर्नाटकाची किनारपट्टी दरम्यान चक्रवातीची स्थिती आहे. ही स्थिती महाराष्ट्राच्या किनारपट्टा पर्यंत असून ती समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर आहे. तर बंगालचा उपसागराचा पश्चिममध्य आणि आंध्र प्रदेश या भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर आहे. आज कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात जम्मू आणि काश्मीर परिसरातही चक्रकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ३.१ आणि ३.६ किलोमीटर दरम्यान आहे.
त्यामुळे उत्तर भारतातील अनेक भागात जोरदार पाऊस पडत असून परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण बनण्यास सुरुवात झाली आहे. परंतु सक्रिय नसल्याने परतीचा पाऊस सुरुवात झाली नाही. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. काही भागात जोरदार वारे वाहणार आहेत. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही भागात अधूनमधून ढगाळ हवामान तयार होत आहे. अनेक भगात कडक ऊन पडत आहे. त्यामुळे उकाड्यात वाढ होत आहे.
Published on: 13 September 2020, 10:03 IST