तीन चार दिवसांपासून गुजरातच्या दक्षिण चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. ही स्थिती अजून दोन ते तीन दिवस राहण्याची शक्यता आहे. बुधवारपर्यंत राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहे. दरम्यान आज आणि उद्या जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभाागाने वर्तवली आहे.
उत्तर भारतात असलेला मॉन्सूनचा पट्टा जैसलमेर, जयपूर, ग्वाल्हेर, सिद्दी, दाल्तोगंज, जमशेदपूर ते उत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगालपर्यंत कार्यरत आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. यामुळे राज्यात पावसाचा जोर कायम असून अनेक ठिकाणी पावसाची संतसधार सुरू आहे. आज कोकणातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरील काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा व विदर्भातही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
उद्या कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार तर विदर्भात व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
उत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगाल यादरम्यान कमी दाबाचे क्षेत्र आहे. या क्षेत्राचे चक्राकार वाऱ्यांमध्ये रुपांतर होण्याची शक्यता आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर आहे. तसेच हरियाणाच्या दक्षिण भागातही चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. दरम्यान गेल्या दिवसापासून राज्यातील बहुतांशी भागात पावसाचा जोर वाढला आहे. काही भागात पावसाची संततधार सुरू आहे. शुक्रवारी सकाळी आठवाजेपर्यंत साताऱ्यातील महाबळेश्वर येते सर्वाधिक १६९.९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातील पाणीपातळीत वाढ होत आहे.
Published on: 15 August 2020, 11:13 IST