News

बंगालच्या उपसागरात उत्तरेस कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अरबी समुद्रात पूर्व-मध्यावर किनारपट्टीच्या उत्तरेस चक्रवाती वर्तुळाकार परिस्थिती निर्माण झाली आहे.

Updated on 04 August, 2020 6:36 AM IST


बंगालच्या उपसागरात उत्तरेस कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अरबी समुद्रात पूर्व-मध्यावर किनारपट्टीच्या उत्तरेस चक्रवाती वर्तुळाकार (सायक्लोनिक सक्र्युलेशन) परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये ४ आणि ५ ऑगस्टला काही ठिकाणी अतिमुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यानुसार कार्यवाही करण्याचा इशारा (रेड अर्लट) देण्यात आला आहे.

दरम्यान सोमवारी हवामान विभागाने मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाचा इशारा दिला होता, पण प्रत्यक्षात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली. काल दिवसभरात केवळ काही सरींपुरताच पाऊस मर्यादीत होता. सायंकाळी उशिरा दक्षिण मुंबई आणि नवी मुंबईत जोरदार पावसाच्या सरी आल्या. या भागात सुमारे २० ते ४० मिमी पाऊस झाला.

दरम्यान हवामान विभागाने आज वर्तवलेल्या अंदाजानुसार, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्य़ात मंगळवारी काही ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते. तर उद्या पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यासह  नाशिक, अहमदनगर, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात मंगळवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

English Summary: Chance of heavy rain on the coastal area; red alert from the weather department
Published on: 04 August 2020, 06:35 IST