News

गेल्या दोन ते तीन दिवस राज्यातील काही भागात पावसाने उघडीप दिली आहे. पण येत्या चार ते पाच दिवस मराठवाडा व मध्य महाराष्ट्राच्या पूर्व भागात हलक्या सरी, कोकण, विदर्भात वाऱ्यासह जोरदार पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Updated on 11 August, 2020 9:33 AM IST


गेल्या दोन ते तीन दिवस राज्यातील काही भागात पावसाने उघडीप दिली आहे. पण येत्या चार ते पाच दिवस मराठवाडा व मध्य महाराष्ट्राच्या पूर्व भागात हलक्या सरी, कोकण, विदर्भात वाऱ्यासह जोरदार पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. मध्य प्रदेशच्या ईशान्य भागात कमी दाबाचे क्षेत्र असून त्याचे चक्राकार वाऱ्यांमध्ये रुपांतर होण्याची शक्यता आहे.

यासह अरबी समुद्र आणि ओमान या दरम्यान आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्यामुळे मॉन्सून पुन्हा सक्रिय होत आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठावाडा व विदर्भातील काही ठिकाणी हलका स्वरुपाच्या सरी कोसळत आहेत. सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत विदर्भातील गोंदिया येथे १४७.६ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर जिल्ह्यातील काही ठिकाणी हलक्या सरी कोसळत आहे. रायगडमधील माथेरान येथे ४२ मिलीमीटर पाऊस झाला.

तर घाटमाथ्यावरही तुरळक सरी बरसल्या असून मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर, या जिल्ह्याच्या पश्चिम भागात काही प्रमाणात पाऊस पडला. सातऱ्यातील महाबळेश्वर येथे ५१.६ मिलीमीटर पाऊस पडला. कोल्हापुरातील राधानगरी धरणक्षेत्रात पुन्हा पाऊस सक्रिय झाल्याने सोमवारी धरणाचा सहा व तीन क्रमांकाचे स्वंयचलित दरवाजे साडेबाराच्या दरम्यान पुन्हा उघडले. या दोन दरवाजातून ४२५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा ९० ट्क्के झाला आहे.

English Summary: Chance of heavy rain in Vidarbha - weather department
Published on: 11 August 2020, 09:33 IST