News

महाराष्ट्रातील अनेक भागात मॉन्सून दाखल झाला असून वरुणराजाने हजेरी लावली आहे. आज कोकण, मराठवाडा, विदर्भात अनेक ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिल्ली -एनसीआरसह देशाच्या इतर भागातही हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Updated on 13 June, 2020 1:50 PM IST


महाराष्ट्रातील अनेक भागात मॉन्सून दाखल झाला असून वरुणराजाने हजेरी लावली आहे.  आज कोकण, मराठवाडा, विदर्भात अनेक ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.  आज दिल्ली -एनसीआरसह देशाच्या इतर भागातही हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडत आहेत.  या पावसामुळे खरीप मशागतींना वेग आला असून काही ठिकाणी पेरण्याही सुरू होणार आङेत.  आज कोकण, विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

दरम्यान गुरुवारी मॉन्सूनने राज्यात धडक दिली असून आज दुसऱ्या दिवशी  प्रगती करत विदर्भासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडाच्या आणखी काही भागात प्रगती केली आहे.  मॉन्सूनने बारामती, बीड, वर्ध्यापर्यंत मजल मारल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.  उद्यापर्यंत मुंबईसह राज्याच्या उर्वरित भागात मॉन्सून दाखल होण्यास पोषक हवामान आहे.  बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र मॉन्सून वाटचालीस पोषक ठरत आहे. गुरुवारी मॉन्सूनने राज्यातील सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील हर्णे बंदर, कोल्हापूर, सांगली, सातारा, आणि सोलापूर, उस्मानाबाद, जिल्ह्याच्या काही भागांपर्यंत पोचला होता.

दरम्यान राजधानी दिल्ली आणि एनसीआर भागातही  १२ ते १३ जूनला पावसाचा अंदाज सांगितलेला आहे. पंजाब आणि हरियाणातील काही भागातही हलक्या आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. दक्षिण - पश्चिम मॉन्सून वेगाने पुढे जात आहे. आज देशातील गोवा, कर्नाटक, तेलगांणा, छत्तीसगड, ओडिशा, आंध्रप्रदेश, केरळ, महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, सिक्किम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, आणि त्रिपुरातील काही भागात मुसळधार पाऊस होणार असल्याचं हवामान विभागाने सांगितले आहे.  गुरुवारी दिल्लीतील तापमानाची नोंद ४०.६ डिग्री सेल्सिअस इतकी करण्यात आली. तर हवेतील आर्द्रतेचा स्तर हा ४७ ते ८२ प्रतिशत टक्के होता.  शुक्रवारी दिल्ली ६० किलोमीटर प्रतितास वेगाने वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.  १५ जून पर्यंत उष्णतेची लहर राहणार असल्याची माहितीही हवामान विभागाने दिली आहे.

दरम्यान मॉन्सून दाखल झाल्याने दक्षिण कोकणात पावसाने जोर झधरला आहे. गोव्यात मुसळधार पाऊस पडत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे १५८ मिलीमीटर, देवगड येथे १४० मिलीमीटर, रामेश्वर येथे १४० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. अरबी समुद्रावरुन वाहणारे वारे राज्यात होत असलेली ढगांची गर्दी यामुळे कमाल तापमानात घट होणार आहे. अरबी समुद्रावर ढगांची दाटी झाली असून बंगालच्या उपसागरात सक्रिय असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकण, गोव्यात पावसाचा जोर वाढणार आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातही मध्यम ते जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे.

English Summary: Chance of heavy rain in Konkan Vidarbha; monsoon will hit the rest of the state
Published on: 13 June 2020, 01:50 IST