मॉन्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे, राज्याच्या विविध भागात हलक्या स्वरुपात वरुण राजाने हजेरी लावली. रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पालघरमधील मोखेडा आणि ठाण्यातील उल्हासनगर येथे १०० मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. आज राज्यात पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रता काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर विदर्भ आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान पुढील ४८ तासात गुजरातच्या विविध भागातही मॉन्सून दाखल होणार आहे. बिहार, झारखंडच्या सीमावर्ती भागात मॉन्सून पोहचला आहे. देशातील सर्वच राज्यात मॉन्सून आपला रंग दाखवणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. तर दोन तीन दिवसात युपी म्हणजेच उत्तर प्रदेशात वरुण राजा हजेरी लावणार आहे.
दरम्यान मॉन्सून दाखल होताच महाराष्ट्रातील विविध ठिकाणी पाऊस झाला आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे उन्हाचा चटका कमी झाला असून बहुतांश ठिकाणी चाळिशीपार गेलेला तापमानाचा पारा ३५ अंशांखाली घसरला आहे. रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे ३५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात मॉन्सून सक्रिय असून कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर राज्यातील उर्वरित शहरात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार आहे.
Published on: 15 June 2020, 02:54 IST