राज्यात आठवडाभर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दक्षिण गुजराती किनारपट्टी ते उत्तर कर्नाटक व उत्तर महाराष्ट्राची किनारपट्टी ते उत्तर केरळ दरम्यान कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. यामुळे राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आजपासून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पावसाचा जोर वाढणार असून वादळी वारे व मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सुत्रांनी दिला आहे.
अरबी समुद्राच्या पूर्वमध्य भाग व महाराष्ट्राची किनारपट्टी यादरम्यान चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती अरबी समुद्राच्या वायव्य परिसर ते गुजरातच्या किनारपट्टीपर्यंत असून ती समुद्रसपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीवर आहे. यासह उत्तर प्रदेशचा आग्नेय भागात कमी दाबाचा पट्टा असून अरबी समुद्राच्या वायव्य भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. दरम्यान बंगालच्या उपसागराच्या पुर्व मध्य आणि उत्तर आंध्रप्रदेशाच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र असून त्यांचे चक्राकार वाऱ्यांमध्ये रुपांतर होण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात असलेला मॉन्सूनचा आस बिकानेर, कसिकर, शिवपुरीपर्यंत आहे.
बंगालच्या उपसागराच्या पश्चिममध्ये भाग व उत्तर आंध्र प्रदेशाच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र आहे. जम्मू आणि काश्मीर व परिसरात समुद्रसपाटीपासून ३.१ आणि ३.६ किलोमीटरच्या दरम्यान चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. सध्या कोकण व मध्य महाराष्ट्राच्या अनेक भागात ढगाळ हवामानाची स्थिती आहे. अधूनमधून ऊन पडत असल्याचे चित्र आहे. आज आणि उद्या संपूर्ण राज्यातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.
Published on: 14 September 2020, 08:57 IST