Chana Bajarbhav : सध्या हरभऱ्याच्या दरात मोठी वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. बरेच शेतकरी अजुनही हरभरा बाजार समितीत विकताना दिसत नाहीत. कारण शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की हरभऱ्याचे दर आणखी वाढतील. तसंच हरभऱ्याचे दर ८ हजार रुपयांपर्यंत जातील का? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
केंद्र सरकारने हरभऱ्याला ५ हजार ४४० रुपये प्रतिक्विंटलचा हमीभाव जाहीर केला आहे. मात्र सध्या बाजार समितीत हरभऱ्याला सरासरी दर ७ हजार रुपयांपर्यंत मिळत आहे. गेल्या एका महिन्यात महाराष्ट्रातील अकोला मंडईत हरभऱ्याचे भाव सुमारे ७०० रुपयांनी वाढले आहेत. आता हे दर ७ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत झाले आहेत. त्यासोबत पुणे बाजार समितीत देखील हरभऱ्याला ७ हजार रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. यासोबत दिल्ली बाजार समितीत देखील हरभऱ्याचे वाढले आहेत.
मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक हे राज्यात हरभरा उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्याने मागणी वाढली आहे. उत्पादन कमी झाल्याने दर वाढले आहेत. यंदा सरकारकडे हरभरा साठाही कमी आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हरभऱ्याला बाजारात चांगला दर मिळत आहे. बाजार समितीत आवक काही प्रमाणात वाढलेली असतांना देखील भाव वाढत आहेत. तसंच यंदा उत्पादन कमी असूनही यावेळी खरेदीदार कोणत्याही किंमतीला हरभरा खरेदी करण्यास तयार आहेत.
केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अहवालानुसार, २०२२-२३ या पीक वर्षात देशात १०४.७१ लाख हेक्टरवर हरभऱ्याची लागवड झाली होती. जी २०२३-२४ मध्ये १०१.९२ लाख टनांवर आली. म्हणजे २.७९ लाख हेक्टरची घट झाली. तशी पाहता ही उत्पादनातील घट मोठी नाही. तसंच भारत हा जगातील सर्वात मोठा हरभरा उत्पादक देश आहे. जगातील एकूण हरभरा उत्पादनात भारताचा वाटा अंदाजे ७० टक्के आहे.
दरम्यान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, गुजरात आणि हरियाणामध्ये हरभरा पेरणीखालील क्षेत्र घटले आहे. या वर्षी २९ फेब्रुवारी रोजी मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, २०२३-२४ मध्ये देशभरात १२१.६१ लाख मेट्रिक टन हरभऱ्याचे उत्पादन झाले. तर २०२२-२३ मध्ये १२२.६७ लाख मेट्रिक टन उत्पादन झाले. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ १.०६ लाख टन उत्पादन घटले आहे.
Published on: 30 May 2024, 03:35 IST