नवी दिल्ली: शेतकरी औषधी वनस्पतींच्या लागवडीतून चांगली आर्थिक कमाई करु शकतात. भारतात झाडांच्या रोपांचे वेगवेगळे भाग वापरून रोग आणि आजारांवर उपचार करण्याची पद्धती बऱ्याच काळापासून सुरू आहे. भारत हा जगातील मोजक्या देशांपैकी एक आहे, ज्या देशाला उच्च जैवविविधता असलेल्या देशाचा दर्जा दिला जातो. या जैवविविधतेचा फायदा शेतकऱ्यांना करुन देण्यासाठी केंद्र सरकारने मोठी योजना आणली आहे. यासाठी सरकार पाच हजार कोटींचा मेगा प्लॅन तयार करत असल्याची माहिती आहे.
भारत सरकारने केलेल्या सर्वेक्षणानुसार, सुमारे 8000 झाडे आणि रोपांचा वापर औषधासाठी केला जातो. त्यांच्यापासून बनवलेल्या उत्पादनांना आणि औषधांना परदेशात चांगली मागणी आहे. या मागणीमुळे शेतकऱ्यांसाठी हर्बल शेतीचा नवा पर्याय खुला झाला आहे.
कोरोनामुळे अनेक लोक पुन्हा एकदा नैसर्गिक पेय आणि औषधांकडे वळले आहेत. शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यापासून ते उत्तम आरोग्यासाठी लोक औषधी वनस्पतींचा अवलंब करत आहेत. औषधी वनस्पतींच्या शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना सर्व शक्य सहकार्य करत आहे. आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत औषधी शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी 4000 कोटी रुपये देण्यात आले आहेत.
राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाने सुमारे अडीच लाख हेक्टर क्षेत्रावर औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी मदत केली आहे. येत्या काही वर्षांत 10 लाख हेक्टर क्षेत्र 4000 कोटी रुपये खर्च करून औषधी वनस्पतींच्या लागवडीखाली आणली जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना सुमारे 5000 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल.
Published on: 13 August 2021, 07:19 IST