New Delhi : केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. हरभरा डाळ सरकारकडून सामान्यांना ६० रुपये किलोने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सर्वसामान्य जनता महागाईने वैतागली आहे. त्यातच सरकारने हा निर्णय घेतल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
डाळींच्या वाढत्या किमतीवर सरकारने मोठी कारवाई केली आहे. सरकारने भारत डाळपासून चणा डाळ बाजारात आणली आहे. चना डाळ ही ‘भारत डाळ’ नावाने ६० रुपये प्रति किलो या सवलतीच्या दराने उपलब्ध होणार आहे. तर ३० किलोच्या पॅकेटची डाळ ५५ रुपये किलो दराने उपलब् असणार आहे. नाफेडच्या ‘भारत डाळ’ सेंटरमध्ये ही डाळ मिळणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून देशातील जनता महागाईने हैराण झाली आहे. ऑक्टोबर महिन्यातील महागाईचे जे आकडे समोर आले आहेत ते काही प्रमाणात दिलासा देणारे आहेत. ऑक्टोबर महिन्यात जुलैपासून महागाईत घट झाली आहे. ग्राहक किंमत निर्देशांक आता ४.८७ टक्क्यांवर घसरला आहे.
सप्टेंबर महिन्यात हा महागाई दर ५.०२ टक्के होता. महागाई रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक पावले उचलली जात आहेत. या संदर्भात काम करत केंद्र सरकारने आता भारत डाळची विक्री सुरू केली आहे. केंद्र सरकार जुलै २०२३ पासून भारत डाळ नावाने चणा डाळ विकत आहे. जनता ही डाळ नाफेड, एनसीसीएफ, केंद्रीय भंडार आणि सफालच्या आऊटलेटवरून खरेदी करू शकते.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून केंद्र सरकारने भारत आटा विक्री सुरु केली आहे. या योजनेतंर्गत केंद्र सरकार स्वस्त दरात पीठ देत आहे. हे पीठ केंद्र सरकार २७.५० रुपये किलो दराने विकत आहे. देशभरातील दोन हजारांहून अधिक केंद्रांवर त्याची विक्री होणार आहे.
Published on: 14 November 2023, 04:08 IST