Onion News : देशभरात कांद्याची आवक घटती असल्यामुळे दर वाढलेले आहेत. यामुळे केंद्र सरकारने दरावर नियंत्रण आणण्यासाठी एक निर्णय घेतला आहे. लाईव्ह मिंटच्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यानं सांगितलं की, सध्याच्या महागाईला आळा घालण्यासाठी सरकार आपल्या बफर स्टॉकमधून सुमारे १६ शहरांमध्ये कांद्याची विक्री सुरू ठेवणार आहे.
लाईव्ह मिंटच्या वृत्तानुसार, सणासुदीत कांद्याची मागणी वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्राने आपल्या साठ्यातून साठा सोडण्यास सुरुवात केली आहे. बाजारात कांद्याची मागणी असल्याने अनेक राज्यांमध्ये मागील पंधरवड्यात कांद्याचे भाव दुपटीने वाढले आहेत. किरकोळ विक्रेत्यांनी सांगितले की, दिवाळी आधी, किरकोळ बाजारात कांद्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. यासोबत इतर भाज्याही महाग झाल्या आहेत.
देशभरातील घाऊक बाजारात कांद्याची किमत ८० प्रतिकिलो वर पोहचली आहे. तीच किमत मागील आठवड्यात ६० रुपये प्रतिकिलो होती. तर त्यापूर्वी ३० रुपये प्रतिकिलो कांदा होता. तसंच आगामी काळात कांद्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चंदीगढ, कानपूर आणि कोलकाता सारख्या इतर शहरांमध्ये कांद्याचे भाव सारखेच आहेत. ते आणखी पुढे जाऊ शकतात, असं देखील किरकोळ बाजारातील विक्रेत्यांचं म्हणणं आहे.
जून-सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील खरीप कांदा पिकाचे नुकसान आहे आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र ही दोन राज्ये कांदा उत्पादनात पुढे असतात पण पावसाने याच भागात कांद्याचे नुकसान झाले आहे. यामुळे आता पुरवठा कमी असल्याने कांद्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, २२ अत्यावश्यक खाद्यपदार्थांच्या किमतींवर नजर ठेवणाऱ्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाने निर्यातीला आळा घालण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे सर्वात मोठा उत्पादक असलेल्या महाराष्ट्रात भाज्यांच्या घाऊक किमती घसरल्या आहेत, असे एका निवेदनात म्हटले आहे.
Published on: 31 October 2023, 11:04 IST