पुणे: जुलै अखेर आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टीसह पुरामुळे झालेल्या जीवित व आर्थिक नुकसानीची माहिती जाणून घेण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकासमोर राज्याचे मदत व पुनर्वसन सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी सादरीकरण करून नुकसानीची माहिती दिली.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या धोरण व नियोजनचे सहसचिव डॉ. थिरुपुगाज यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय पथक पाहणी दौऱ्यावर आले आहे. काल संध्याकाळी त्यांचे पुण्यात आगमन झाले. आज सकाळी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात सर्व संबंधित अधिकाऱ्यांची त्यांनी आढावा बैठक घेतली. या पथकात चित्तरंजन दास, आर.पी. सिंग, व्ही.पी. राजवेदी, मिलींद पनपाटील, संजय जैस्वाल, ओमकिशोर या केंद्रीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ते पुणे विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांची दोन दिवस पाहणी करून दि. 31 ऑगस्ट रोजी पथक कोकण विभागात जाणार आहे.
समितीसमोर झालेल्या नुकसानीची माहिती सादर करताना सचिव किशोरराजे निंबाळकर म्हणाले, या आपत्तीत प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन बचाव व मदत कार्य युध्दपातळीवर केले. यावर्षी मान्सूनचे राज्यात उशीरा आगमन झाले. त्यानंतर दि. 3 ते 10 ऑगस्ट या कालावधीत कोकण आणि पुणे विभागात अतिवृष्टी झाली. या दोन्ही विभागातील भीमा आणि कृष्णा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला.
पुरामुळे बाधित झालेल्या राज्यातील 7 लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. या बाधित लोकांची 1 हजारहून अधिक शिबिरात व्यवस्था करण्यात आली. या बाधित लोकांना शासनाच्या वतीने 10 किलो तांदूळ आणि गहू तसेच रॉकेलचे वाटप करण्यात आले. तसेच बाधित झालेल्या ग्रामीण कुटुंबाला प्रत्येकी 10 हजार तर शहरी भागातील कुटुंबांना 15 हजार रुपयाचे सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले. या अतिवृष्टीमुळे जीवितहानी बरोबरच वित्त हानीही मोठ्या प्रमाणावर झाली आहे. शेतीचेदेखील नुकसान झाले आहे. या आपत्तीमध्ये बाधित अत्यावश्यक सेवा सुरळीत करण्यासाठी राज्य शासनाने प्राधान्य दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे विभागातील नुकसानीची माहिती देताना डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले,विभागातील 58 तालुक्यांपैकी 38 तालुक्यांना पुराचा आणि अतिवृष्टीचा फटका बसला. यामध्ये 727 गावे बाधित झाली असून 1 लाख 80 हजार 448 कुटुंबातील7 लाख 59 हजार 595 लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. या आपत्तीत विभागातील 60 लोकांचा मृत्यू झाला त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील 10, सातारा जिल्ह्यातील 6, सांगली जिल्ह्यातील 28, सोलापूर जिल्ह्यातील 3 तर कोल्हापूर जिल्ह्यातील 13 जणांचा समावेश आहे. या आपत्तीत सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान झाले.
अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराचे पाणी नद्यांच्या धोकापातळीपेक्षा 7 ते 8 फुटांनी अधिक होते. कोल्हापूर जिल्ह्याचा रस्ते संपर्क पूर्णत: तुटला होता. सांगली व कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागालाही याचा मोठा फटका बसला. या दोन्ही जिल्ह्यात बागायती क्षेत्र अधिक असून या पुरामुळे या पिकांचे पूर्णत: नुकसान झाले आहे. तसेच इचलकरंजी या शहरात असणाऱ्या हॅण्डलूम आणि पॉवरलूम या उद्योगाला याचा फटका बसला असून या ठिकाणचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर घरांची पडझड झाली. शेतीसह शेतकऱ्यांच्या पशूधनाचेही मोठे नुकसान झाले आहे.
कोकण विभागातील नुकसानीची माहिती देताना विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड म्हणाले, 27 जुलै रोजी महालक्ष्मी एक्सप्रेस या रेल्वेला पुराचा फटका बसल्याने ही रेल्वे पुराच्या पाण्यात आडकली होती. त्या दरम्यान कोकण विभागात अतिवृष्टी झाली. महाड, चिपळूण या शहरात पाणी घुसले होते. या अतिवृष्टीमुळे शेती, रस्ते, पूल आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यालाही अतिवृष्टीचा फटका बसला. या काळात प्रशासनाने बचाव व मदत कार्यावर भर दिला. त्यांनी यावेळी झालेल्या आर्थिक नुकसानीची माहिती दिली. या बैठकीला जिल्हाधिकारी नवल किशोर राम, कृषी आयुक्त सुहास दिवसे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
Published on: 30 August 2019, 08:19 IST