शाळेतील सुगंधित दूध वाटपामुळे दूध-उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक लाभ
राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळाने (एन.डी.डी.बी.) कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सी.एस.आर.) अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत सुगंधित दूध वितरणाचा कार्यक्रम हाती घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना पाच स्वादात उपलब्ध असलेले सुगंधी दूध पिण्यास मिळणार आहे. सोबतच विदर्भातील दूध-उत्पादक शेतकऱ्यांना एक बाजारपेठ लाभून त्यांचाही आर्थिक लाभ यामुळे होणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि केंदीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले.
स्थानिक हनुमान नगर येथील नागपूर महानगरपालिकेच्या लाल बहादूर शास्त्री हिंदी प्राथमिक शाळेमध्ये एन.डी.डी.बी. फाऊंडेशन फॉर न्युट्रिशन अंतर्गत दूध वितरणाच्या ‘गिफ्ट मिल्क’ या कार्यक्रमाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री तथा उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार नागो गाणार, महापौर श्रीमती नंदा जिचकार, जि.प. अध्यक्षा श्रीमती निशा सावरकर, विभागीय आयुक्त अनूप कुमार व एन.डी.डी.बी. चे अध्यक्ष दिलीप रथ, प्रकल्प संचालक रविंद्र ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते.
आपल्या देशात 36 टक्के मुले ही कुपोषणग्रस्त आहेत. त्यांना दूधासारखा सकस व पौष्टिक आहार मिळाल्यास ते सुदृढ होतील. विदर्भाच्या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी एन.डी.डी.बी. मार्फत दूध संकलित करुन ते मदर डेअरीच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी उपलब्ध केले आहे. नागपूर शहरात दर दिवसाला मदर डेअरीमधून 8 लक्ष रुपयाचे दूध व 8 लक्ष रुपयाचे इतर दुग्ध उत्पादने असे एकूण 16 लक्ष रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. यामुळे दरवर्षी विदर्भातील सर्व जिल्ह्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांना सुमारे 60 कोटींचे उत्पन्न मिळणार आहे. मदर डेअरीमुळे नागरिकांना दूध व शुद्ध दुग्ध उत्पादने स्वस्त दरात मिळण्याची सुविधा मिळत आहे.
नागरिकांनी लग्नसमारंभ किंवा इतर कार्यक्रमप्रसंगी चहा किंवा शीतपेयाऐवजी सुगंधीत दूध जर पाहुण्यांना प्यायला दिले, तर त्यांनाही पौष्टिक आहार मिळेल व दूधाचा खप वाढून शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल, असे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. बँक व इतर सार्वजनिक उद्योगांनीही पुढाकार घेऊन सी.एस.आर अंतर्गत शाळांमध्ये दूध वितरणाचा कार्यक्रम राबवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमधील महाजेनकोच्या पर्यावरण परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळेत सी.एस.आर अंतर्गत ‘गिफ्ट मिल्क’ हा कार्यक्रम सुरु करण्याची घोषणा यावेळी केली.
नागपूर जिल्ह्यातील 21 शाळांमधील सुमारे 6 हजार विद्यार्थ्यांना या गिफ़्ट मिल्क कार्यक्रमामुळे सुटीचे दिवस वगळता प्रत्येक दिवशी जीवनसत्व ‘अ’ व ‘ड’ ने परिपूर्ण असलेले 200 मिली सुगंधित दुध मिळणार आहे. एन. डी. डी. बी. फाऊंडेशन फॉर न्युट्रिशन अंतर्गत यापूर्वीच गुजरात, झारखंड, तेलंगणा व तामिळनाडू येथील शासकीय शाळांमध्ये शिकणाऱ्या 22 हजार मुलांसाठी ‘गिफ़्ट मिल्क’ कार्यक्रम सुरु झाला असल्याची माहिती एन.डी.डी.बी. चे अध्यक्ष दिलीप रथ यांनी दिली.
या कार्यक्रमास महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचे सभापती दिलीप दिवे, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, लाल बहादुर शास्त्री हिंदी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केलेत. कार्यक्रमाचे संचालन श्रीमती एनडीडीबीच्या उप व्यवस्थापक श्रीमती प्रीत गांधी तर आभार मदर डेअरीचे अमिताभ मुखर्जी यांनी मानले.
Published on: 13 August 2018, 11:00 IST