News

अहवाल शासनास सादर करावा. नुकसान भरपाई मिळण्यापासून कुणीही शेतकरी वंचित राहू नये, याची दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्या.

Updated on 15 September, 2021 7:36 PM IST

   जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, संभाव्य तिसऱ्या लाटेची पुर्वतयारी, लसीकरण, महसूल वसूली उद्दिष्ट, जिल्हा परिषदेचे विषय आदींची आढावा बैठक राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आली. त्यावेळी आढावा घेताना ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर केंद्रीय ग्राम समिती अध्यक्ष तथा खासदार प्रतापराव जाधव, पंचायत राज समिती अध्यक्ष तथा आमदार डॉ. संजय रायमूलकर, आमदार संजय गायकवाड, बुलडाणा कृउबास सभापती जालींधर बुधवत, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते आदी उपस्थित होते.  

 

      ग्रामस्तरावरील यंत्रणांनी गावागावात जावून नुकसानीची माहिती घेण्याचे सूचीत करीत राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, नैसर्गिक आपत्तीमध्ये नागरिकांना धीर द्यावा. नुकसानीची माहिती घेवून कुणीही गरजू मदतीपासून वंचित राहता कामा नये.

त्यामुळे पंचनामे पूर्ण करून घ्यावे. तिसऱ्या कोरोना संसर्ग संभाव्य लाटेची चर्चा सुरू आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांनी दुसऱ्या लाटेचा धड घेत ऑक्सिजन निर्मिती पुरवठा, साठा याबाबत पुर्वतयारी करून ठेवा. जिल्ह्यात दुसरा डोस घेतलेल्या लाभार्थ्यांची टक्केवारी कमी आहे. त्यामुळे पहिला डोस घेवून दुसऱ्या डोससाठी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांचे नियोजन करून घ्यावे. कुणाचा दुसरा डोस केव्हा येणार, आल्यानंतर त्याने लस घेतली की नाही, याबाबत ठोस कृती आराखडा तयार करावा. लसीकरणामध्ये एखादा तालुका ‘टारगेट’ करून त्यामध्ये युद्धपातळीवर लसीकरण मोहिम राबवावी तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांच्या उद्दिष्टासाठी काम करून पुर्ण लसीकरण करावे. त्यासाठी व्यापारी, धर्मगुरू यांच्या बैठका घ्याव्यात. गैरसमज पसरविणाऱ्यांवर कारवाई करावी. तो तालुका लसीकरणात आदर्श बनवून राज्यासमोर उदाहरण निर्माण करावे. लसीकरण हे राष्ट्रीय कर्तव्य असून यामध्ये ग्रामस्तरावरील सर्व यंत्रणांचा उपयोग करून घ्यावा. तसेच लोकप्रतिनिधींची मदत घेवून हे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे.  

 

  ते पुढे म्हणाले, बुलडाणा व मोताळा तालुक्यात नदीकाठावर पूर येवून नुकसान झाले आहे. त्यासाठी नदीपात्रातील अतिक्रमण, नदीपात्राचे अरूंद होणे, प्रवाहामध्ये मानवनिर्मित अडथळा निर्माण होणे आदी कारणीभूत आहेत.

तरी संबंधित यंत्रणेने नदीपात्र रूंदीकरणाचा डिपीआर बनवावा. या डिपीआरला शासनाकडे सादर करून मंजूरी घ्यावी व नदीपात्रांचे नैसर्गिक रूंदीकरण करून घ्यावे. जेणेकरून भविष्यात अतिवृष्टी झाली, तरी शेतांचे नुकसान होणार नाही व पंचनामे करण्याची गरज पडणार नाही. ड्रोनद्वारे गावठाण सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. या पारदर्शक पद्धतीमुळे मोजणीतील अनेक त्रुट्या दूर करण्यात येणार आहे. त्यावरून मिळकत पत्रिका तयार होणार आहे. ही नागरिकांना भविष्यात सुविधा देणारी पद्धत आहे. त्यामुळे ड्रोन सर्वेचे काम गतीने पुर्ण करावे.  

 यावेळी खासदार प्रतापराव जाधव यांनी यंत्रणांनी लसीकरणातील अडचणी दूर कराव्यात. कुठे गरज पडल्यास नक्की लोकप्रतिनिधींचे सहकार्य घ्यावे, अशा सूचना केल्या. आमदार संजय गायकवाड म्हणाले, नदी पात्र अरूंद झाल्यामुळे प्रवाहात अडथळे निर्माण झाले. परिणामी आलेल्या पूरात शेती वाहून गेली. यावर कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे. संबंधित यंत्रणेने नदीपात्र अरूंद असल्यास आजुबाजूच्या शेतकऱ्यांना विश्वासात घेवून त्याचे तोटे सांगून अतिक्रमण काढून घ्यावे. पात्र रूंद करून प्रवाह सुरळीत करावा. आमदार डॉ. संजय रायमूलकर म्हणाले, लोणार व मेहकर तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या भागाचा पंचनामा करून त्यांनाही नुकसान भरपाई द्यावी. कुणालाही नुकसान भरपाईपासून वंचित ठेवू नये.

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक यांनी नुकसानीची माहिती दिली. घरे, गुरे व मानवी मृत्यूची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस व अति. जिहा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांनी कोरोना संसर्ग पुर्वतयारी व लसीकरणाची माहिती दिली. त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे यांनी जिल्हा परिषदेकडील विषयांची माहिती दिली. बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, संबंधित विभागांचे विभागप्रमुख, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

प्रतिनिधि - गोपाल उगले

 

English Summary: care should be taken to enshure that no one is deprived of compensation-minister abdul sattar
Published on: 15 September 2021, 07:36 IST