सध्या रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध सुरू होऊन आजचा नववा दिवस आहे. या युद्धाचे परिणाम आंतरराष्ट्रीय पातळीवर होताना दिसत आहे.बऱ्याच वस्तूंच्या भाव वाढ होण्यावर त्याचा परिणाम होत आहे.
या युद्धाचे विपरीत परिणाम कृषी क्षेत्रावर देखील होण्याची दाट शक्यता असून त्याच्या झळा शेतकऱ्यांना सोसाव्या लागू शकतात. जर त्यामध्ये रासायनिक खतांचा विचार केला तर शेती क्षेत्रामध्ये रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो आणि नेमके एकट्या रशिया मधून 12 टक्के खत आयात केले जाते. त्यानुसार 70 लाख टन डीएपीची आयात होते इतकेच नाही तर पोटॅश 50 लाख टन आयात केले जाते. या युद्धामुळे या आयातीवर परिणाम झाला असल्याने किंमत वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच रासायनिक खतांच्या निर्मिती साठी जो कच्चामाल लागतो त्याचा पुरवठा विस्कळीत झाल्याने येणाऱ्या काळात रासायनिक खतांची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
भारताने रशियासोबत फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खत आयातीसाठी करार केले होते.परंतु या करारानंतर काही दिवसांमध्येच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. या करारानुसार दरवर्षी डीएपी आणि पोटॅश प्रति वर्षी दहा लाख टन आणि एनपीके आठ लाख टन खतांची आयात करणार हे स्पष्ट करण्यात आले होते परंतु सध्याच्या युद्धजन्य वातावरणामुळे खतांचा पुरवठा विस्कळीत होऊ लागल्याने समस्या निर्माण होत आहेत.
जर ही परिस्थिती लवकर मिटली नाहीतर खतांच्या किमती वाढतील हे निश्चित आहे. खरीप हंगामात खतांचा तुटवडा भासू नये म्हणून इतर पर्यायांचा शोध घेणे सुरू झाले आहे. भारतीय खत कंपन्या जॉर्डन, मोरॉक्को आणि कॅनडा या देशांतून पुरवठा होऊ शकतो का याची चाचपणी करीत आहेत.
Published on: 04 March 2022, 10:51 IST