नाशिक जिल्हा म्हटले म्हणजे द्राक्षाची पंढरी असे संबोधले जाते. नाशिक जिल्ह्यातील बहुतांश या क्षेत्रावर द्राक्षाची लागवड केलेली आहे आणि मागील काही वर्षांपासून नवीन द्राक्षबाग लागवड देखील वाढलेली आहे. नाशिक जिल्ह्यातील बरेचशे द्राक्ष बागायतदार शेतकरी हे द्राक्ष निर्यात करण्याच्या उद्देशाने आणि त्याच पद्धतीच्या नियोजनाने द्राक्षाचे उत्पादन घेतात.
जर आपण द्राक्षांचा परिपक्व कालावधी पाहिला तर हा 120 ते 130 दिवसांचा असतो. परंतु या वर्षी परिस्थिती जरा उलट आहे. यावर्षी पाऊस उशिरापर्यंत चालल्यामुळे ऑक्टोबर महिन्यामध्ये बाग छाटणीला सुरुवात झाली. या परिस्थितीचा विचार केला तर आता फक्त 80 ते 90 दिवसांची द्राक्ष फळे आहेत. आत्ता द्राक्षाच्या घडामधून पाणी उतरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. येणाऱ्या 10 ते 15 दिवसांमध्ये द्राक्ष निर्यात योग्य होऊन द्राक्षांची निर्यात होऊ शकेल, असे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्याचा विचार केला तर यावर्षी पाऊस उशिरा सुरू झाला तसेच सरासरीपेक्षा अधिक चांगला झाला.त्यासोबतच बरेच दिवस ढगाळ वातावरण राहिल्याने द्राक्ष पिकावर रोगराई आली आणि कडाक्याची थंडी तसेच अवकाळी पाऊस यामुळे द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बऱ्याच ठिकाणी द्राक्ष मण्यांना तडे जाण्याची शक्यता. या सगळ्या कारणांमुळे निर्यातयोग्य द्राक्षांचे उत्पादन घटेल असा अंदाज असल्याने द्राक्षांना उच्चांकी दर मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजून कारण म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये कोरोनाचे संकट असल्यामुळे द्राक्ष व्यापारी कारण पुढे करून कमी दराने द्राक्षबागांचे बुकिंग करत आहेत. म्हणून द्राक्ष बागायतदारांनी कमी दरात द्राक्षबागांचे बुकिंग करू नये असे त्यांना सांगण्यात आले आहे.
तसेच अशा प्रकारच्या व्यापार्यांकडून द्राक्ष बागायतदारांनी सावध राहावे. सध्या द्राक्ष मऊ पडण्याची प्रक्रिया सुरू असून त्यामुळे द्राक्षाची गोडी, आकार यामध्ये वाढवून पुढील पाच ते दहा दिवसांमध्ये म्हणजेच जानेवारीच्या शेवटच्या व फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये परिसरातील द्राक्ष निर्यात योग्य होतील व द्राक्षांना उच्चांकी दर मिळण्याची शक्यता देखील अधिक आहे.
Published on: 27 January 2022, 09:45 IST