नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली अर्थविषयक केंद्रीय समितीने 1 डिसेंबर 2019 ते 30 नोव्हेंबर 2020 : इथेनॉल पुरवठा वर्षाच्या कालावधीत आगामी साखर हंगाम 2019-20 साठी ईबीपी कार्यक्रमांतर्गत वेगवेगळ्या कच्च्या मालापासून मिळणाऱ्या इथेनॉलच्या वाढीव किंमती निश्चित करण्यासह खालील बाबींना मंजुरी दिली आहे.
- सी हेवी मोलासेस (मळी) पासून मिळवलेल्या इथेनॉलची किंमत प्रति लिटर 43.46 रुपयांवरून 43.75 प्रति लिटर पर्यंत वाढवणे.
- बी हेवी मोलासिस (मळी) पासून मिळवलेल्या इथेनॉलची किंमत प्रति लिटर 52.43 रुपयांवरून 54.27 प्रति लिटर पर्यंत वाढवणे.
- ऊसाचा रस/साखर/साखरेचा पाक यापासून मिळवलेल्या इथेनॉलची किंमत 59.48 रुपये प्रति लिटर निश्चित करणे.
- याशिवाय, जीएसटी आणि वाहतूक शुल्क देखील देय असेल. तेल विपणन कंपन्यांना वास्तविक वाहतूक शुल्क निश्चित करण्याची सूचना करण्यात आली आहे जेणेकरून इथेनॉलची लांबच्या अंतरावरील वाहतूक महाग होणार नाही.
- तेल विपणन कंपन्यांना इथेनॉलचा प्राधान्यक्रम पुढील प्रमाणे ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
१) ऊसाचा रस/साखर/साखरेचा पाक
२) बी हेवी मोलासेस
३) सी हेवी मोलासेस
४) क्षतिग्रस्त खाद्यान्न/अन्य स्रोत
सर्व भट्ट्या (डिस्टिलरी) या योजनेचा लाभ घेऊ शकतील आणि त्यापैकी बहुतांश ईबीपी कार्यक्रमासाठी इथेनॉलचा पुरवठा करतील अशी आशा आहे. इथेनॉल पुरवठादारांना किफायतशीर मूल्य दिल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकबाकी कमी होऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या कमी करण्यात मदत होईल.
ऊसाच्या रसाच्या विविध प्रकारांद्वारे मिळणाऱ्या इथेनॉलच्या खरेदीसाठी अधिक किंमत दिल्यामुळे ईबीपी कार्यक्रमासाठी इथेनॉल उपलब्धतेत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. प्रथमच इथेनॉल उत्पादनासाठी साखर आणि साखरेचा पाक यांना अनुमती देण्यात आली आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्यामुळे आयातीवरील अवलंबत्व कमी होईल, कृषी क्षेत्राला मदत होईल, पर्यावरण अनुकूल इंधनाचा जास्त पुरवठा, कमी प्रदूषण आणि शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न यासारखे अनेक लाभ होतील.
Published on: 06 September 2019, 07:55 IST