सिंधुदुर्ग: मच्छिमार समाजाच्या विकासासाठी सर्वते सहकार्य दिले जाईल. तसेच मच्छिमार भगिनींच्या सोयीसाठीच वेंगुर्ल्यात सुसज्ज असे मच्छिमार्केट उभारण्यात येत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज वेंगुर्ले नगरपरिषदेच्या नवीन मच्छिमार्केटच्या भूमीपूजन समारंभावेळी केले.
यावेळी बंदर विकास व वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, माजी आमदार पुष्पसेन सावंत, माजी आमदार शंकरभाई कांबळी, राजन तेली आदी मान्यवरांसह वेंगुर्लेवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी वेंगुर्ले नगरपरिषदेच्या नवीन सभागृहाचे उद्घाटनही पालकमंत्री श्री. केसरकर व बंदर विकास मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
सर्वसामान्यांचा विकास हेच ध्येय असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले की, केरवाडा, नवाबाग, निवती आणि आचरा बंदरातील गाळ काढण्याच्या कामास मंजुरी देण्यात आली आहे. मच्छिमार वस्त्यांकडे जाणारे सर्व रस्ते व जिल्ह्यातील सर्व प्रमुख रस्त्यांची कामे पावसापूर्वी पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यासाठीच्या निधीची तरतूद यापूर्वीच केली असून लवकरच रस्त्यांचे कामही सुरू होणार आहे. वेंगुर्ला व नवाबाग यांना जोडणाऱ्या पुलाचे काम रखडले होते. पण आता या पुलाचे काम लवकरच सुरू होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी नवीन गस्ती नौका लवकरच येणार आहेत. कोकणातील चार जिल्ह्यांना प्रत्येकी एक या प्रमाणे चार गस्ती नौंकासाठी 34 लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. या गस्ती नौका आल्यानंतर परराज्यातील बोटींचा स्थानिकांना होणारा त्रास बंद होईल असा विश्वास आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी वेंगुर्ल्यात बॅटरी ऑपरेटेड पाणबुडी येणार असल्याचेही पालकमंत्री श्री. केसरकर यांनी यावेळी सांगितले.
वेंगुर्ला वासियांचे अनेक वर्षांचे सुसज्ज मच्छिमार्केटचे स्वप्न आज पूर्ण होत असल्याचे सांगून राज्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, सर्वांच्या सहकार्यामुळेच मच्छिमार्केटचे काम मार्गी लागले आहे. मासे खवय्यांच्या या गावात सुसज्ज असे नवीन मच्छिमार्केट होत आहे. या कामासाठीच्या निधीचा विनियोग योग्य प्रकारे होण्यासाठी सर्व वेंगुर्ले वासियांनी या कामावर देखरेख करावी, सहा महिन्यात ही वास्तू उभी राहील. विकासासाठी सर्वांनी मतभेद विसरून एकत्र येण्याचे उत्तम उदाहरण म्हणजे आजचा मच्छिमार्केटच्या पायाभरणीचा समारंभ आहे. त्यामुळेच सर्वांनी विकासासाठी एकत्र यावे असे आवाहनही त्यांनी केले.
नवीन मच्छिमार्केटच्या उभारणीबद्दल सर्व वेंगुर्लेवासियांचे अभिनंदन करुन नगराध्यक्ष दिलीप गिरप म्हणाले की, वेंगुर्ला हा काजू, आंबा आणि मासे यासाठी प्रसिद्ध आहे. मच्छिमार समाजाचा विचार करुनच सर्वसोयिनियुक्त असे सुसज्ज मच्छिमार्केट उभारण्यात येत आहे. तसेच या प्रकल्पामध्ये पार्किंगची सोय असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यासाठी मदत होणार आहे. मांडवी खाडीतील गाळ काढणे गरजेचे आहे. तसेच वेंगुर्ल्याच्या हद्दवाढीचा विचार व्हावा. वेंगुर्ल्याच्या विकासासाठी कटीबद्ध असल्याचे ते पुढे म्हणाले. सुरुवातीस सिंधुदुर्ग विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीताने उपस्थितांचे स्वागत केले.
Published on: 03 November 2018, 06:57 IST