1. बातम्या

बुद्ध पौर्णिमा : भूतांना बसवणारा वृक्ष देतो माणसांना सर्वाधिक ऑक्सिजन

KJ Staff
KJ Staff


आज सर्वत्र बुद्ध पौर्णिमा साजरी केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही बुद्ध पौर्णिमाच्या शुभेच्छा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे दिल्या.  सर्व खंडांत बौद्ध अनुयायी असून आशिया खंडात तर बौद्ध धर्म हा मुख्य धर्म आहे. आपण  गौतम बुद्धांविषयी सर्वजण जाणून आहात.  गौतम बुद्ध (इ.स.पू. ५६३ – इ.स.पू. ४८३) हे भारतीय तत्त्वज्ञ व बौद्ध धम्माचे संस्थापक होते.  आजच्याच दिवशी गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती. 

गौतम बुद्धांनी जेव्हा संन्यास घेतला होता. त्यादरम्यान ते बिहार राज्यातील गया येथे निरंजना नदीच्या काठी पिंपळाच्या वृक्षाखाली ध्यानस्थ बसले होते. इ.स.पू. ५२८ मध्ये वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी त्यांना दिव्य ज्ञानप्राप्ती झाली.  बुद्धांना ज्या पिंपळाच्या वृक्षाखाली ‘बुद्धत्व’ प्राप्त झाले त्या वृक्षाला ‘बोधिवृक्ष’ (ज्ञानाचा वृक्ष) असे म्हणतात.  गौतम बुद्धा ज्या वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली होती त्या वृक्षाच्या औषधी गुणांविषयी आणि त्या वृक्षाबाबतीत असलेल्या अंधश्रद्धेविषयी आपण माहिती घेणार आहोत. बुद्धांना ज्ञान देणाऱ्या वृक्षाविषयी समजात वेगळा समज आहे. उलट पिंपळ वृक्ष तुळशीप्रमाणे हवा शुद्ध करण्याचे काम करतो. 

पिंपळ हा भारतात सर्वत्र आढळणारा वृक्ष, बोधी वृक्ष या नावानेही ओळखला जातो. पिंपळ हे भारतीय उपखंडातील वृक्ष आहे. हा वृक्ष भिंतीवर, छपरावर, खडकावर, खांबावर, झाडावर, जेथे जागा मिळेल तेथे वाढतो. हा ‘मोरेसी’ म्हणजे ‘वट’ कुलातील वृक्ष आहे. याचे वनस्पतिशास्त्रातील नाव ‘फायकस रिलिजिओसा’ आहे. पिंपळाची उंची १० ते १५ मीटरपर्यंत वाढते. खोड पांढरट गुलाबी, लाल, गुळगुळीत, तंतुमय असते. पाने हृदयाकार, लांब देठाची, कोवळी असतात. 

पिंपळाचे वैशिष्ट्ये -

पिंपळाच्या झाडापासून ‘लाख’ बनवितात. याच्या औषधाने व्रण बरे करतात. उदरशूल व पोटाचे अन्य विकार यावर पिंपळाच्या फळांचा वापर करतात. याच्या सालींचा काढा पौष्टिक व शक्तिवर्धक असतो. हा वृक्ष केवळ हवा शुद्ध करणारा नाही तर त्यात अनेक औषधी गुणधर्मही आहेत. आयुर्वेदातील अनेक औषधे यापासून बनतात तसेच हा वृक्ष दिवसा व रात्रीही ऑक्सिजन वायूच बाहेर टाकतो त्यामुळे हवेचे शुद्धीकरण होत राहते. आपल्या ऑक्सिजन देणारा हा वृक्ष भरपूर आयुष्य असते म्हणून याला ‘अक्षय’ वृक्ष असे म्हणतात.

हृदय विकारापासून दूर राहण्यासाठी पिंपळाची ताजी १० ते १५ पाने १ ग्लास पाण्यात उकळून ते मिश्रण एक तृतीयांश होईपर्यंत आटवावे. नंतर ते गाळून गार झाल्यावर तीन सम भागात सकाळच्या वेळात दर तीन तासांनी घ्यावे. यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. अनेक प्रकारच्या व्याधी दूर करण्यासाठी पिंपळाची पाने, साल वापरली जाते. दांत मजबूत व पांढरे शुभ्र दिसण्यासाठी पिंपळ सालाची राखुंडी बनवून वापरावी. त्यासाठी १० ग्रॅम साल, कात व २ ग्रॅम काळी मिरी एकत्र करून त्याची बारीक पूड करावी व हे मंजन वापरून दात घासावेत. दात मजबूत हेातील. पिंपळाच्या पानांचा रस कावीळीवर उपयुक्त आहे.

ज्यांना दमा, अस्थमाचा त्रास आहे, त्यांनी पिंपळाच्या सालीच्या आतला गाभा काढून वाळवावा. त्यानंतर त्याचे बारीक चूर्ण करून पाण्यासोबत घेतल्याने दम्याचा त्रास कमी होतो. त्याचबरोबर हवा बदलल्याने होणारी सर्दी, खोकला, पडसे यावर पिंपळाची ५ पाने दुधात उकळून ते साखरेसह सकाळी आणि सायंकाळी घ्यावे. दरम्यान पिंपळाच्या सालीपासून लाल रंग तयार होतो. बौद्ध भिक्खू या रंगाने आपले वस्त्र रंगवतात. हडाप्पा अणि मोहोंजेदाडोच्या उत्खननात सापडलेल्या नाण्यांवर पिंपळाच्या पानाच्या आकृती आहेत.

पिंपळाच्या वृक्षाविषयीच्या समज आणि गैरसमज

पिंपळाला भारतीय समाजात मानाचे व पूजनीय स्थान आहे. हिंदू संस्कृतीत, ज्या वृक्षांना 'तोडू नये' असा दंडक आहे, त्यापैकी हा एक. अश्वत्थ मारुतीचे (पिंपळाखाली असलेल्या मारुतीचे) मारुतीचे पूजन हितकारी, पुण्यकारक म्हणून वर्णिले आहे. श्रावण महिन्यातील शनिवारी पिंपळाची पूजा करतात. पिंपळ हा पुष्य नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.  पिंपळाच्या पानांचा एकमेकांवर आपटून पावलांच्या आवाजासारखा आवाज होतो. त्यामुळे पिंपळावर भूत (मुंजा) असते असा समज झाला आहे. त्याकरता लोक पिंपळाच्या झाडाखालून रात्री जात नाहीत.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters