भंडारा
भाजप नेते आशिष देशमुख यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना भाजप मध्ये येण्याची ऑफर दिली आहे. शेतकरी हितासाठी भाजप एक पक्ष आहे त्यामुळे तुपकरांनी भाजप सोबत यावे, असंही देशमुख यांनी म्हटले आहे. देशमुख भंडाऱ्यात आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. त्यावेळी ते बोलत होते.
सध्या समाज माध्यमात शेतकरी नेते रविकांत तुपकर स्वाभिमानी पक्षाबद्दल नाराज आहेत, अशी चर्चा आहे. तसंच तुपकर यांनी (दि.२) कार्यकर्त्यांची तातडीची बैठक घेतली होती. या बैठकीत तुपकर यांनी पक्षातंर्गत असणारे मतभेद चव्हाट्यावर आणलेत. यामुळेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेत तुपकर नाराज आहेत, अशी चर्चा रंगली आहे.
राजू शेट्टी यांच्याकडून तुपकर यांचे नेतृत्व दाबण्यात प्रयत्न सुरु असल्याचीही चर्चा आहे. याला खुद्द तुपकर यांनी दुजोरा दिला आहे. आपला केसाने गळा कापण्याचा प्रयत्न होत असल्याचे तुपकर म्हणालेत. अशातच आता आशिष देशमुखांनी त्यांना भाजपमध्ये येण्याची खुली ऑफर दिली आहे. याबाबत तुपकर नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, तुपकर नाराज असलेल्या वृत्तावर राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "येत्या आठ दिवसांमध्ये शिस्त पालन समितीची बैठक होणार होणार आहे. त्या बैठकीला राज्यातील महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित असणार आहेत. या बैठकीला रविकांत तुपकर यांना देखील बोलावण्यात आले आहे. तसंच त्याच्याबद्दल कुणाचे किंवा त्यांचे कुणाबद्दल मतभेद असतील तर ते ऐकून घेतले जातील. आणि याबाबत जर अंतर्गत वाद असले तर तो मिटवला जाईल."
Published on: 04 August 2023, 03:03 IST