नागपूर: तणस, तुऱ्हाट्या, पऱ्हाटी तसेच नेपीअर गवत यासारख्या जैवभारापासून बायो. सी.एन.जी. ची निर्मिती केल्याने विदर्भातील शेतकऱ्यांचा आर्थिक लाभ होऊन रोजगार निर्मितीसही चालना मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग जहाज बांधणी मंत्री तसेच केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन यांनी नागपूर येथे केले. रॉमॅट इंडास्ट्रिज प्रायव्हेट लिमिटेड तर्फे उत्तर नागपूरच्या ऑटोमेटिव्ह चौक भागातील सी.एन.जी. पंपाच्या मुख्य स्थानकाचे उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महापौर नंदा जिचकार, परिवहन समितीचे अध्यक्ष बंटी कुकडे, रॉमॅट कंपनीचे संचालक व्हि. सुब्बाराव प्रामुख्याने उपास्थित होते.
रामटेक तालुक्यात लागवड होणाऱ्या नेपीअर ग्रासला बायोडायजेस्टद्वारे बायो सीएनजी साठी वापरण्यात येत आहे. याचे सुमारे 150 प्रकल्प विदर्भात सुरू होणार असून याव्दारे शेतकरी प्रति एकरी दोन लाख उत्पन्न घेऊ शकतात व या प्रकल्पामुळे सुमारे 1 लाख रोजगाराची क्षमता निर्माण होईल असे गडकरी यांनी यावेळी निर्दशनास आणून दिले.
एखाद्या खाजगी कंपनीच्या सी.एन.जी. पंपाचे मुख्य स्थानक असणारे नागपूर हे देशातील पहिले शहर असून किफायतशीवर व निर्यात पर्यायी इंधन असणाऱ्या सी.एन.जी. मूळे नागपूर शहर प्रदूषण मुक्त होईल असे मत गडकरी यांनी यावेळी मांडले. रॉमॅट प्रकल्पाच्या माध्यमातून नागपूरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सुमारे 50 विद्यार्थ्यांना रोजगार मिळणार असल्याचही त्यांनी यावेळी नमूद केले.
नागपूर महानगर पालिकेच्या ताफ्यातील सर्वच डिझेल वाहने 3 माहिन्यात 100 टक्के सी.एन.जी. वर रूपांतरीत करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. मनपाच्या 7 बायोडायजेस्टर पैकी 5 बायोडायजेस्टर मध्ये शहरातील सांडपाणी, कचरा व घनकचरा याव्दारे सुमारे 40 ते 50 टन बायो सी.एन.जी. निर्मिती झाल्यानंतर मनपाच्या बसेस, ट्रक व कार आता बायोसीएनजीवर संचालित होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
रॉमॅट कंपनीचे सी.एन.जी. पंप हे कामठी रोड, वाडी तसेच वर्धा रोड येथे संचालित झाले असून त्याव्दारे एल.एन.जी पासून सी.एन.जी. चे रूपांतर होत आहे. नजीकच्या काळात नागपूरच्या सर्वच महामार्गावर असे ‘कन्वर्जन सेंटर्स’ रॉमॅटने करावे, अशी सूचना त्यांनी यावेळी केली. या कार्यक्रमाला रॉमॅट, पेट्रोनेट, इंडिअन ऑईल कंपनीचे अधिकारी, म.न.पा.चे पदाधिकारी, नगर सेवक उपास्थित होते.
Published on: 14 September 2019, 07:40 IST