राज्यात गेल्या काही दिवसांपासून पीक विमा बाबत अनेक तक्रारी समोर येत आहेत. असे असताना आता राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक (येलो मोझॅक) हा विषाणूजन्य रोग आणि खोडकूज, मूळकूज या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.
यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. आता कृषी विभाग आणि मदत व पुनर्वसन विभागांनी संयुक्तपणे तातडीने सोयाबीन पिकांचे पंचनामे सुरू करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिले.
पावसाचा मोठा खंड आणि सप्टेंबरमध्ये झालेला पाऊस, तापमानात बदल तसेच इतर काही कारणांमुळे सोयाबीनवर या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. विशेषत: चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, यवतमाळ, सोलापूर, लातूर, वाशीम, नांदेड या जिल्ह्यांत हा प्रादुर्भाव दिसत असल्याने सोयाबीनचे पीक पिवळे पडत चालले आहे.
नुकसान झालेल्या क्षेत्रामध्ये विमा संरक्षित क्षेत्राचा अंतर्भाव असल्यामुळे विम्याची मदत वेळेत करणे शक्य व्हावे आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळावा म्हणून प्राधान्याने हे पंचनामे करावेत, असे निर्देश देण्यात आले.
यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. याबाबत गेल्या काही दिवसांपासून शेतकरी मागणी करत होते. अखेर याबाबत आता सरकारने पाऊल उचलून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
Published on: 04 October 2023, 10:08 IST