राज्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला असताना ऊस जळाल्याच्या अनेक घटना घडत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. आता परभणी जिल्ह्यातील सोमेश्वर आणि फळा या दोन गावांतील सुमारे १०० एकरावरील ऊस आगीमध्ये जळाला. यामुळे याच्या चौकशीची मागणी शेतकरी करत आहेत. अनेक शेतकरी आओप्ला ऊस घालवण्यासाठी पळापळ करत असताना या घटना घडत आहेत. अतिरिक्त उसामुळे सध्या आधीच शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. यामुळे वजनात देखील घेत होत आहे.
यंदाचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असताना जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील ऊस उभा आहे. शेकडो हेक्टरवरील ऊस वाळून गेला आहे. त्यात गेल्या काही दिवसांत आग लागून ऊस जळण्याच्या घटना घडत आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अनेकांच्या उसाला हुमणी लागली आहे. तसेच ऊस वाळू लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. सध्या वीज देखील महावितरणकडून तोडली जात आहे. यामुळे उसाला पाणी कसे द्यायचे असा प्रश्न देखील शेतकऱ्यांसमोर उभा आहे.
दुपारी विजेच्या ठिणग्या पडल्यामुळे सोमेश्वर आणि फळा या दोन गावांच्या सीमेवरील उसाला आग लागली. वाळलेल्या पाचटीमुळे आग पसरत गेली. गंगाखेड येथील अग्निशामक दलास आग विझविण्यास काही तासाचा वेळ लागला. यामुळे काही शेतकऱ्यांचा ऊस जळण्यापासून वाचला नाहीतर नुकसानाचा आकडा अजून वाढला असता. या घटनेत दोन गावांतील ५० हून अधिक शेतकऱ्यांचा सुमारे शंभर एकरावरील ऊस जळाला आहे. यामुळे या शेतकऱ्यांवर दुष्काळात तेरावा महिना आला आहे.
यामुळे आता सर्व बाधित शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. हा ऊस नेमका कशामुळे पेटला की पेटवून दिला याची सध्या चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. सध्या अनेक ठिकाणी शेतकरी हे ऊस पेटवून देत आहेत, याचे कारण म्हणजे कारखान्याकडून लवकर उसाला तोड येत नाही. यामुळे लवकर उसाला तोड यावी म्हणून शेतकरी हा मार्ग स्वीकारत आहेत. यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.
Published on: 08 March 2022, 05:52 IST