पशुधनाला गोठ्यातच उपचार मिळावा यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाला याचा मोठा फायदा होणार आहे. ग्रामीण आणि अति दुर्गम भागातील पशुधनाला गोठ्यातच वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने फिरत्या पशुचिकित्सालय सुरू केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त २५ मोबाईल वाहनांचे लोकार्पण करण्यात आले आहे. यावेळी अजित पवार म्हणाले, या वाहनांद्वारे प्रभावी पशुवैद्यकीय सेवा मिळण्यासाठी ही सर्व वाहने जीपीएस प्रणालीवर करावीत. ग्रामीण आणि दुर्गम भागात पशुधनाला वेळेत, परवडणाऱ्या दरात उपचार मिळाले पाहिजे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष कुमार प्रसाद म्हणाले, फिरते पशुचिकित्सालय सुरू करणारी ही राज्यातील पहिली जिल्हा परिषद ठरली आहे. कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती बाबूराव वायकर, सारिका पानसरे उपस्थित होते.
१९६२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क केल्यास या मोबाईल वाहनांद्वारे ठरलेल्या गावातील शेतकऱ्यांना सेवा मिळेल. तज्ज्ञ शासकीय पशुवैद्यक या वाहनात असतील. अन्य उपचारांसोबतच अवघड शस्त्रक्रियाही या फिरत्या वाहनात होतील. ५० रुपये इतके माफक शुल्क असेल, अशी माहिती पशुसंवर्धन समिती सभापती बाबूराव वायकर यांनी दिली.
तातडीच्या सेवा, अपघात, जाग्यावर पडणे, कष्टमय प्रसूती, विषबाधा, सर्पदंश आदी. सेवा मिळणार आहेत. त्याचबरोबर, ताप, डायरिया, स्तनदाह, कृत्रिम रेतन, अपचन, दूध कमी, गर्भ तपासणी, स्वास्थ दाखला, शस्त्रक्रिया, शवविच्छेदन, खच्चीकरण, जंतुनाशके, लसीकरण आदी. यावर हि उपचार केले जाणारा आहेत.
Published on: 28 January 2022, 12:28 IST