News

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शेतकरी शेतातील वीज ही दिवस देण्याची मागणी करत होते. असे असताना आता कोल्हापूर जिल्हातील शेतकऱ्यांसाठी

Updated on 26 January, 2022 10:30 AM IST

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शेतकरी शेतातील वीज ही दिवस देण्याची मागणी करत होते. असे असताना आता कोल्हापूर जिल्हातील शेतकऱ्यांसाठी महावितरणने एक मोठा निर्णय घेतला आहे. महावितरणच्या कोल्हापूर ग्रामीण 1 व ग्रामीण 2 या विभागातील शेती वीजपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. या भागातील शेतकर्‍यांनी शेतीला पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे वीजपुरवठा मिळावा, अशी मागणी केली होती. या निर्णयामुळे आता येथील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

याबाबत कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी निर्देश दिल्यानंतर महावितरणकडून शेती वीजपुरवठ्याचे वेळापत्रकात तातडीने बदल करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांवर होणारे प्राण्यांचे हल्ले आता काहीसे कमी होणार आहेत. महावितरणच्या कोल्हापूर ग्रामीण 1 विभागात पन्हाळा, गगनबावडा, शाहूवाडी, करवीर, तर कोल्हापूर ग्रामीण 2 विभागात राधानगरी, कागल, भुदरगड या तालुक्यांचा समावेश होतो. महावितरणकडून या भागातील शेतीच्या वीजपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून यामुळे शेतकरी नाराज होते. त्याबाबतचे आदेश नुकतेच प्राप्त झाले आहेत.

दरम्यान आता कोल्हापूर ग्रामीण 1 विभागात रात्री 1.15 ते सकाळी 9.15 वाजेपर्यंत ऐवजी आता रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत या वेळेत शेती वाहिनीवर वीजपुरवठा केला जाईल. कोल्हापूर ग्रामीण 2 विभागात रात्री 1 ते सकाळी 9 वाजेपर्यंत याऐवजी आता रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत तर दिवसाचा सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंतऐवजी सकाळी 8.40 ते 4.40 वाजेपर्यंत या वेळेत शेती वाहिनीवर वीजपुरवठा केला जाईल, असे सांगितले गेले आहे.

आता कोल्हापूर ग्रामीण 1 : रात्री 10 ते सकाळी 6, कोल्हापूर ग्रामीण 2 : रात्री 9 ते सकाळी 5 दिवसा : सकाळी 8.40 ते दुपारी 4.40 . अशा प्रकारे वीज दिली जाणार आहे. रात्रीचे शेतात गेल्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर हल्ले झाले आहेत. यामध्ये अनेक शेतकरी जखमी देखील झाले आहेत. यामुळे अनेकांनी याबात मागणी केली होती, शेतकऱ्यांच्या या मागणीचा विचार करून पालकमंत्री सतेज पाटील यांनी त्याबाबत निर्णय घेतला आहे. राज्यातील अनेक शेतकरी याबाबत अजूनही मागणी करत आहेत.

English Summary: Big news! Changes in the night schedule of agricultural power supply. (1)
Published on: 25 January 2022, 04:14 IST