सोयाबीन बियाण्याच्या पिशव्यांमध्ये भेसळ असल्याची बाब उघड झाली आहे. भेसळ बियाण्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. परभणी जिल्ह्यातील चार तालुक्यांतील ३५ शेतकऱ्यांनी २०२१ च्या खरीप हंगामात ६२.८८ हेक्टरवर पेरणी केलेल्या सोयाबीनच्या १५२ पिशव्यांमध्ये भेसळयुक्त बियाणे असल्याचे उघडकीस आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
तालुक्यांतील ३५ शेतकरी कृषी विभागाकडे गेले होते. त्यात जिंतूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या २२ तक्रारी, परभणी, सेलू तालुक्यातील प्रत्येकी चार आणि पाथरी तालुक्यातील पाच तक्रारींचा समावेश आहे. २०२१ च्या खरीप हंगामात पेरणी केलेल्या सोयाबीनमध्ये अन्य वाणांच्या बियाण्याची भेसळ असल्यामुळे नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
सोयाबीनच्या बियाण्यामध्ये अन्य वाणांची ३६ ते ८२ टक्के भेसळ आढळून आली आहे. त्याअनुषंगाने अहवाल कृषी आयुक्तलयाकडे पाठविण्यात आला आहे. असे सूत्रांनी सांगितले. भेसळ्युक्त बियाण्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तत्काळ अदा करावी, अशी मागणी तक्रारदार शेतकऱ्यांनी केली आहे. कृषी विभाग तसेच कृषी विद्यापीठाच्या पथकाने संबंधित शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन सोयाबीन पिकांची पाहणी केली आहे.
Published on: 03 February 2022, 05:19 IST