News

राज्यात दुधाच्या दरात अचानक मोठी घसरण झाली आहे. याचा परिणाम दूध उत्पादक शेतकऱ्यांवर होत असून दूध उत्पादक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे दूध उत्पादक आक्रमक झाले आहेत. गाईच्या दुधाला प्रति लिटर 35 रुपयांचा दर मिळत होता. मात्र, सध्या दुधाला प्रति लिटरसाठी 27 रुपयांचा दर मिळत असल्याने मंत्र्यांच्या दारात दूध ओतण्याचं आंदोलन करु असा इशारा किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी दिला आहे.

Updated on 15 November, 2023 5:37 PM IST

राज्यात दुधाच्या दरात अचानक मोठी घसरण झाली आहे. याचा परिणाम दूध उत्पादक शेतकऱ्यांवर होत असून दूध उत्पादक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे दूध उत्पादक आक्रमक झाले आहेत. गाईच्या दुधाला प्रति लिटर 35 रुपयांचा दर मिळत होता. मात्र, सध्या दुधाला प्रति लिटरसाठी 27 रुपयांचा दर मिळत असल्याने मंत्र्यांच्या दारात दूध ओतण्याचं आंदोलन करु असा इशारा किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी दिला आहे.

डॉ. अजित नवले यांनी सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेअर करत सरकारवर टीका केली आहे. या व्हिडीओमध्ये अजित नवले म्हणतात की, ऐन सणासुदीच्या काळात महाराष्ट्रात दुध उत्पादकांची लुटमार सूरू आहे. 35 रुपये प्रतिलीटर दुधाचा दर पाडून संघनमत करून दर 27 रुपयांपर्यंत नेला आहे. त्याचबरोबर येत्या काही दिवसांमध्ये दुधाचा दर 25 रुपयांपर्यंत खाली नेला जाईल अशा प्रकारचे संकेत देण्यात आलेले आहेत असे अजित नवले म्हणालेत.

तसेच दुधाचे दर अशा प्रकारे पाडले जाऊ नये यासाठी दुग्धविकास मंत्र्यांनी पुढाकार घेवुन एक समिती गठित केलेली होती. यामध्ये खाजगी आणि सहकारी दूध संघांच्या प्रतिनिधींचा समावेश केलेला होता. या समितीने 35 रुपये दर दिला जाईल अशा प्रकारची घोषणा केली होती असेही अजित नवले म्हणालेत.

मात्र आता सणासुदीच्या काळात कुणाचे ही लक्ष आपल्याकडे नाही, अशा प्रकारचा गैरसमज असल्यामुळे खाजगी आणि सहकारी दूध समिती एकत्र येत समितीच्या या निर्णयाला वाटाण्याच्या अक्षदा लावल्या आहेत आणि 27 रुपयांपर्यंत भाव आणलेले आहेत. त्यामुळे दुग्धविकास मंत्री आणि दुग्धविकास विभागाला आम्ही आव्हान करतोय की त्यांनी या सगळ्या बाबतींमध्ये हस्तक्षेप करावा. किमान 35 रुपये शेतकऱ्यांना दुधाचे दर द्यावे. असं झालं नाही आणि शेतकऱ्यांची लुट सुरु राहिली, तर मंत्र्यांच्या दारामध्ये येऊन सणासुदीच्या काळात दूध ओतण्याचे आंदोलन दूध उत्पादक शेतकरी संघटन समिती आणि किसान सभेला करावं लागेल असा इशारा नवलेंनी दिलाय. दुधाला किमान प्रतिलिटर 35 रुपयांचा दर द्यावा अशी मागणी किसान सभेचे नेते डॉ.अजित नवले यांनी केली आहे.

English Summary: Big drop in milk prices during festival season; Aggressive milk producers
Published on: 15 November 2023, 05:37 IST