राज्यात मराठा आरक्षणाची धग काही कमी होताना दिसत नाहीये. मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय उपमुख्यमंत्र्यांना पंढरपुरात शासकीय महापूजा करू देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे. तसेच मराठा समाजाचा प्रक्षोभ पाहता कार्तिकी पूजेसाठी कोणत्याही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण देणार नाही, अशी भूमिका मंदिर समितीने घेतली आहे अशी माहिती गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.
दरवर्षी कार्तिकी एकादशीला विठ्ठल रखुमाईची पूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते केली जाते. पण यावेळेस महाराष्ट्राला दोन उपमुख्यमंत्री मिळाल्याने या कार्तिकी एकादशीला देवेंद्र फडणवीस की अजित पवार या दोघांपैकी कोण विठ्ठल रखुमाईची पूजा कोण करणार अशा चर्चां रंगल्या होत्या. मात्र आज या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. मराठा समाजाच्या मागणीमूळे हा मान कोणत्याच उपमुख्यमंत्र्यांना न देण्याचा निर्णय मंदिर समिती कडून घेण्यात आला आहे.
आज पंढरपूर मध्ये भक्तनिवास येथे कार्तिकी एकादशीच्या नियोजनाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकत्यांनी प्रवेश करत घोषणा दिल्या. तसेच कार्तिकी एकादशीला कोणत्याही उपमुख्यमंत्री, आमदार, खासदार यांना महापूजेसाठी येऊ देणार नाही तर मंदिर समितीने देखील कोणत्याही उपमुख्यमंत्री आमदार खासदारांना निमंत्रित करू नये, असे मराठा समाज आज निवेदन देऊन गेला आहे. त्यामूळे मराठा समाजाच्या भावना पाहता मराठा आरक्षणाबाबतचा संपूर्ण निकाल लागेपर्यंत पंढरी क्षेत्रामध्ये आम्ही कुठल्याही मंत्र्याला येऊ देणार नाही आहोत. तसेच ही गोष्ट आम्ही महाराष्ट्र सरकारच्या कानावर टाकणार आहेत असे विठ्ठल मंदिर समितीचे अध्यक्ष औसेकर महाराज यांनी सांगितले.
Published on: 08 November 2023, 04:59 IST