बऱ्याचदा आधुनिक शेती करताना रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. यातून जमिनीचा पोत बिघडतो. लवकरात लवकर उत्पन्न वाढावे पिकांची तसेच फळांची वाढ व्हावी यासाठी देखील रासायनिक गोष्टींचा वापर केला जातो. याचा पिकांवर आणि त्यांच्या उत्पादनावर देखील परिणाम होतो.आरोग्याच्या दृष्टीने कृत्रिमरीत्या उगवलेल्या पिकांचे,फळांचे गंभीर नुकसान आहेत. त्यामुळे रासायनिक खतांचा अतिवापर टाळून नैसर्गिक शेतीला प्राधान्य देण्यावर भर देणं गरजेचं आहे.
नैसर्गिक शेतीला उत्तेजन देण्यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी येत्या जूनपासून राज्यात ५२०० गावांमध्ये नैसर्गिक शेती करण्यात येणार असल्याचं सांगितलं. तसेच या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून देशी गायींच्या पालनासाठी दरमहा अनुदानही देण्यात येणार असल्याचे चौहान यांनी सांगितलं.राज्यात रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या वापरामुळे विविध पिकांचे उत्पादन वाढले आहे.
परंतु त्यांच्या अतिवापराचे दुष्परिणामही आपण भोगत आहोत असे देखील त्यांनी सांगितले. रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीचा पोत बिघडत चालला आहे. त्यामुळे राज्य सरकार अशा खतांचा वापर आटोक्यात आणण्यासाठी नैसर्गिक शेतीला चालना देत आहे. रासायनिक गोष्टींचा वापर कमी करण्यासाठी नैसर्गिक शेती हाच एक रामबाण उपाय आहे.
नैसर्गिक संसाधनांचा खते म्हणून वापर झाल्यास जमिनीला फायदेशीर आहे. शेतात मातीचे महत्व हे अनन्यसाधारण आहे. नैसर्गिक संसाधनांचा वापर झाल्यास जमिनीतील कार्बनचे प्रमाण सुधारेल. या शेतीसाठी राज्य सरकारने स्वतंत्र मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.शिवाय नैसर्गिक शेतीला अधिक चालना देण्यासाठी एक टास्क फोर्सही स्थापन करण्यात येणार असल्याचे समोर आले आहे.
ही नैसर्गिक शेती नर्मदा नदीपात्रालगतच्या परिसरात करण्यात येणार आहे. यासाठी राज्यसरकार शेतकऱ्यांना वेळोवेळी प्रोत्साहन देणार आहे. नैसर्गिक शेतीसाठी नैसर्गिक खतांची निर्मिती आवश्यक आहे. या खतांच्या निर्मितीसाठी शेतकऱ्यांना देशी गायीचे पालन करणे आवश्यक आहे. म्हणून राज्यसरकार देशी गायीच्या पालनासाठी संबंधित शेतकऱ्यांना दरमहा ९०० रुपये अनुदान देण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्याचा नादच खुळा! डाळिंबाच्या संरक्षणासाठी अनोखी शक्कल, राज्यातच चर्चा...
शेतकरी आत्महत्येचं सत्र सुरूच; धक्कदायक आकडेवारी आली समोर
देशात किंवा परदेशात शिक्षण घेण्यासाठी लोन घेण्याचा विचार करत आहात का? 'ही'कागदपत्रे असतात आवश्यक
Published on: 27 April 2022, 11:27 IST