भारत कृषिप्रधान देश आहे देशाची अर्थव्यवस्था ही कृषी क्षेत्रावर आधारित आहे. मात्र, शेतकरी बांधवांना आपले उत्पन्न वाढविण्यासाठी काळाच्या ओघात काही अमुलाग्र बदल करणेदेखील अपेक्षित आहे. यामध्ये प्रामुख्याने शेतीव्यवसायाला शेती पूरक व्यवसायाची सांगड घालणं हे महत्त्वाचे आहे. सध्या देशातील अनेक शेतकरी शेती व्यवसायाला शेतीपूरक व्यवसायाची जोड देऊ लागले आहेत.
यासाठी मायबाप शासन देखील शेतकऱ्यांना मोठे सहकार्य करत असते. याशिवाय शेती पूरक व्यवसाय जोमाने वाढावा म्हणून नवनवीन प्रयोग देखील राबविले जात आहेत. अशाच शेतीपूरक व्यवसाय पैकी एक आहे मधमाशीपालन. या व्यवसायाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे या व्यवसायासाठी अतिशय कमी इन्व्हेस्टमेंट करावी लागते. असे असले तरी या व्यवसायासाठी प्रशिक्षण घेणे हे महत्त्वाचे ठरते.
या व्यवसायात यश संपादन करण्यासाठी प्रशिक्षण घेणे अतिमहत्त्वाचे. विना प्रशिक्षण या व्यवसायात यश संपादन केले जाऊ शकत नाही. एका आकडेवारीनुसार संपूर्ण जगात एकूण नऊ लाख 92 टन मध उत्पादित केले जाते. सालाना एकट्या भारतात जवळपास 33 हजार टन मध उत्पादित केला जात असल्याचा अंदाज वर्तवला गेला आहे.
मधाचा औषधात वापर आणि पिकाच्या उत्पादनात देखील वाढ
मधात असलेल्या औषधी गुणधर्मांमुळे याचा मोठ्या प्रमाणात औषध बनवण्यासाठी वापर केला जातो. मधात जवळपास 11 प्रकारची खनिजे आढळतात यामध्ये प्रामुख्याने कॅल्शियम मॅग्नेशियम आणि लोह यांचा समावेश आहे. यामध्ये असलेल्या याच औषधी घटकांमुळे 80% मधाचा वापर केवळ औषधे बनविण्यासाठी केला जातो. औषधे बनवण्याव्यतिरिक्त याचा वापर सध्या कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे.
यामुळे मधाला बारामाही बाजार उपलब्ध असल्याचे सांगितले जाते, बारामाही मागणी असल्याने मधाला चांगला दर देखील मिळत असतो. याव्यतिरिक्त मधाचा शेतकऱ्यांना अजून दुसरा फायदा होत असतो. मधमाशी मध तयार करण्यासाठी फुलांवर बसते, आणि फुलातून मध गोळा करून आणत असते. मधमाशी मध तयार करण्यासाठी एका फुलावरुन दुसऱ्या फुलावर बसते यावेळी परागिभवन क्रिया पार पडत असते. यामुळे पिकाच्या उत्पादनात भरीव वाढ होते.
इतर शेतीपूरक व्यवसायापेक्षा मधमाशीपालन हा व्यवसाय कमी खर्चात सुरु करता येत असल्याने या व्यवसायात दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे भारतात सध्या मोठ्या प्रमाणात मध उत्पादित केले जात असून देशातून मधाची निर्यात देखील वाढली आहे. हाती आलेल्या आकडेवारीनुसार, 2019-20 या आर्थिक वर्षात देशातून सुमारे 59 हजार मेट्रिक टन मध निर्यात केले केले आहे. त्यामुळे हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी एक चांगला पूरक व्यवसाय ठरू शकतो.
या व्यवसायासाठी कमी खर्च येत असल्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी हा व्यवसाय एक नवसंजीवनी देण्याचे कार्य करणार आहे. विशेष म्हणजे या व्यवसायासाठी प्रशिक्षण अतिमहत्त्वाचे असते आणि देशातील तमाम कृषी विज्ञान केंद्रांमध्ये मधमाशी पालनासाठी प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जात आहे. यामुळे हा व्यवसाय उभारणे आता सोयीचे झाले आहे.
Published on: 27 March 2022, 10:40 IST