News

भारतात उत्पादित होणाऱ्या नैसर्गिक मधाला देशांतर्गत आणि विदेशातील बाजारपेठेत मोठी मागणी आहे. देशात मधाचे उत्पादन वाढत असून याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. देशात उत्पादित होण्याचे प्रमाण १ लाख २० हजार टनांवर पोचले असून निर्यात ६१ हजार ३३ टन झाली आहे.

Updated on 20 March, 2020 2:43 PM IST


भारतात उत्पादित होणाऱ्या नैसर्गिक मधाला देशांतर्गत आणि विदेशातील बाजारपेठेत मोठी मागणी आहे. देशात मधाचे उत्पादन वाढत असून याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. देशात उत्पादित होण्याचे प्रमाण १ लाख २० हजार टनांवर पोचले असून निर्यात ६१ हजार ३३ टन झाली आहे. मागील पाच वर्षात उत्पादनात ५७.५८ टक्के वाढ झाली आणि निर्यात ११६.१३ टक्क्यांनी वाढल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. 

अलीकडच्या काळात स्थलांतरित स्वरुपाच्या मधमाशी पालन व्यवसायात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मधाचा उपयोग औषधनिर्मिती, खाण्यासाठी तसेच खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी होत असल्याने बाहेरील देशांमधून मागणी वाढत असल्याचे आशादायी चित्र आहे. त्यामुळे कृषी पूरक व्यवसाय रोजगापाती संधी म्हणून पाहिल्यास अर्थकारणाला मोठा वाव आहे. चालू वर्षी भारतातून ६१ हजार ३३ टन निर्यात झाली  असून यातून ७३२ कोटी १६ लाख परकीय चलन भारताला मिळाले आहे. महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार व हिमाचल प्रदेश या राजांमध्ये व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ लागली आहे.  महाराष्ट्रात मधमाशी पालन उद्योग राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राबवला जातो.  

नवोदित व्यावसायिकांना एक सुवर्णसंधी

कमी गुंतवणूक करुन व कमी कालावधीत भरपूर उत्पन्न कमवू शकतात. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी मोठ्या, मोकळ्या जागेची गरज असते, जिथे तुम्हाला पेट्या ठेवता येतील. जर समजा तुम्ही २०० ते ३०० पेट्या ठेवणार असाल तर तुम्हाला अंदाजे ४ हजार ते ५ हजार स्क्वेअर फुट जागा लागते. दरम्यान आपल्याला पेट्या आणि मधमाश्या वेगळ्या खरेदी कराव्या लागतात.  एपिस मेलीफेरा ही माशी सर्वात जास्त मध देणारी आणि अंडे देणारे मधमाशी आहे. ही प्रजाती खरेदी करणे फायदेशीर असते. या लघू उद्योगाला साहाय्य म्हणून सरकारकडून आपल्याला २ ते ५ लाख रुपये कर्जही मिळू शकते.  मधमाशी पालन कसे करावे यासाठी आपल्याला प्रशिक्षणही दिले जाते. भारत सरकारच्या सेंट्रल बी रिसर्च  अॅन्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमधून आपल्याला प्रशिक्षण मिळू शकते.   https://nbb.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता.  मधुमक्षिका पालन करण्यासाठी जानेवारी ते मार्च आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा कालावधी चांगला असतो. 

English Summary: bee export increased by 116.13 percent
Published on: 20 March 2020, 02:42 IST