सध्या उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यात निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. याच यूपीमधील निवडणुका महाराष्ट्रातील (Maharashtra) शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी सिद्ध होत आहे, या निवडणुकामुळे (Election) राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी (Grape Growers) चिंतेत सापडले आहेत. त्याच झालं असं यूपीमध्ये निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या (agricultural market) बंद करण्यात आल्या आहेत. परिणामी उत्तर प्रदेश राज्यात द्राक्षाला मागणी आणि उठाव कमी झाला आहे. याचा सर्वात जास्त फटका महाराष्ट्रातील विशेषता नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांना बसत आहे.
राज्यात सर्वात जास्त द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते, राज्याच्या एकूण द्राक्ष उत्पादनात पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याचा मोठा सिंहाचा वाटा आहे. हेच कारण आहे की नाशिक जिल्ह्याला द्राक्षे पंढरी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे उत्तर प्रदेश राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर द्राक्षे पंढरीतील द्राक्ष उत्पादक चिंतेत सापडले आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार, ज्या द्राक्ष व्यापाऱ्यांच्या जिल्ह्यातून चार ते पाच गाड्या दिवसाला पॅक होत होत्या सध्या त्याच व्यापाऱ्यांच्या मागणी कमी असल्याने केवळ एक ते दोन गाड्या रवाना होत आहेत. अशीच परिस्थिती 11 ते 12 मार्च पर्यंत कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. व्यापाऱ्यांच्या मते, उत्तर प्रदेश राज्यातील निवडणुकांच्या निकालानंतर परिस्थिती पुन्हा एकदा सामान्य होईल आणि पुन्हा नव्याने द्राक्षांची मागणी वाढेल. परिणामी द्राक्षाच्या दरात देखील सुधारणा होऊ शकते.
सध्या द्राक्षे पंढरीत द्राक्षांची हार्वेस्टिंग जोरात सुरू आहे, द्राक्ष हार्वेस्टिंग जोरात सुरू असली तरी देशांतर्गत द्राक्षला विशेष मागणी बघायला मिळत नाही याचे प्रमुख कारण उत्तर प्रदेश राज्यातील निवडणुकांना सांगितले जात आहे. देशांतर्गत द्राक्षाला मागणी कमी असल्याने द्राक्षे पंढरीमध्ये खूपच कमी दरात द्राक्ष हार्वेस्टिंग सुरू आहे. जिल्ह्यात अनेक द्राक्ष बागायतदारांचे सौदे होऊनदेखील द्राक्षांची अद्याप काढणी सुरू झालेली नाही. असे सांगितले जात आहे की, उत्तर प्रदेश राज्यात बाजार समित्यांनाच इलेक्शन बूथ बनवण्यात येत आहे, त्यामुळे अनेक बाजार समित्या बंद आहेत तर काही बाजार समित्या दुसऱ्या ठिकाणी भरवल्या जातं आहेत.
त्यामुळे द्राक्षांना मागणी असूनही खरेदीदार ज्या ठिकाणी द्राक्षाचे खरेदी होत आहे या ठिकाणी जाण्यास टाळाटाळ करताना बघायला मिळत आहेत. याशिवाय अनेकांना बाजार कुठे भरतो याची कल्पना नाही त्यामुळे द्राक्षाच्या उठावात मोठी घट झाली आहे. बाजारपेठेतील गणितानुसार शेत मालाला उठाव कमी असला की बाजारभावात आपोआप घसरण होते, द्राक्षांच्या बाबतीत देखील तसेच होत आहे. सध्या काळ्या मन्याच्या द्राक्षांना पन्नास रुपये प्रतिकिलो एवढा नगण्य दर मिळत असून, हिरव्या द्राक्षांना तर केवळ 35 रुपये किलो एवढाच दर मिळत आहे. या एवढ्या कवडीमोल दरात उत्पादन खर्च आणि उत्पन्न यांची सांगड घालता-घालता द्राक्ष उत्पादकांच्या नाकी नऊ आले आहेत.
Published on: 05 March 2022, 10:21 IST