किनगावराजा येथून जवळच असलेल्या पांग्री उगले शिवारात अस्वल दिसल्याने ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली.पाण्याच्या शोधार्थ ते अस्वल फिरत असल्याची चर्चा परिसरात होत आहे.
पांग्री उगले येथील आत्माराम साळवे व जुलाल उगले हे सकाळी ६ वाजेच्या सुमारास पांग्री ते किनगावराजा रस्त्याने मॉर्निंग वॉकसाठी फिरायला गेले असता अचानक त्यांच्या समोरून एक अस्वल रस्ता ओलांडून जात असतांना दिसले त्यामुळे त्यांनी घाबरून ते अस्वल दूर जाईपर्यंत जागेवरच थांबले.अस्वल सहसा एकटे फिरत नसते त्यामुळे त्याच्यामागे आणखी अस्वल येतात काय याची साळवे व उगले यांनी शहानिशा केली असता त्यांना दुसरे अस्वल दिसले नाही.
अस्वल हा शाकाहारी प्राणी आहे.
परंतु भीतीमुळे तो मनुष्यवस्ती तसेच गुरांवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न करू शकतो.सध्या ऊन जास्त तापत असल्यामुळे जंगली प्राण्यांना पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे,त्यामुळे अनेक प्राणी पाण्याच्या शोधार्थ ज्याठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करीत आहेत.
त्यामुळे पांग्री उगले शिवारातील शेतकऱ्यांनी सावध राहूनच आपल्या शेतामध्ये जावे अशा सूचना करण्यात येत आहे.
Published on: 20 April 2021, 11:32 IST