भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. नाशिक जिल्ह्यात देखील अवकाळीचा हाहाकार बघायला मिळत आहे जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने येथील शेतकरी संकटात सापडला आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली गेली आहे. खरीप हंगामातील लाल कांद्याची नुकतीच काढणी झाली आहे, त्यामुळे आलेल्या पावसाने शेतकरी बांधवांची कांदे झाकण्यासाठी झुंबळ उडताना बघायला मिळाली.
तसेच चांदवड तालुक्यात व परिसरात रब्बी हंगामातील उन्हाळी कांदा लागवड जोर पकडू लागली आहेया नुकत्याच लावल्या गेलेल्या रब्बी हंगामातील उन्हाळी कांद्याला देखील या अवकाळी मुळे झटका बसला आहे. कांदा पिकासमवेतच तालुक्यातील द्राक्ष पिकाला देखील या अवकाळी मुळे मोठा फटका बसला आहे. शनिवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा अस्मानी संकटाचा सामना करावा लागत आहे. शनिवारी रात्री आठच्या सुमारास सुमारे अर्धा तास अवकाळी पावसाने हजेरी लावली यामुळे तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी कांदा झाकण्यासाठी धावपळ करताना नजरेस पडले.
तालुक्यात या अवेळी आलेल्या पावसामुळे शेतकरी बांधवांचे लाखोंचे नुकसान होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या अवकाळी पावसामुळे सर्वात जास्त फटका कांदा आणि द्राक्षे पिकांना बसत असल्याचे सांगितले जात आहे. तालुक्यात द्राक्षबागा काढणीसाठी तयार आहेत आणि अशातच या अवेळी आलेल्या पावसामुळे द्राक्ष बागांनामोठी हानी पोहोचू शकते. या अवकाळी पावसामुळे द्राक्ष मण्यांना तडे जाण्याची शक्यता द्राक्षबागायतदारांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादनात घट होऊ शकते तसेच द्राक्ष बागांना अजून महागड्या फवारण्या कराव्या लागतील त्यामुळे खर्चात वाढ होईल. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकर्यांना लाखो रुपयांचा फटका बसणार. वडनेर भैरव परिसरात देखील द्राक्ष बागांना मोठ्या प्रमाणात अवकाळी मुळे फटका बसताना दिसत आहे. या परिसरातील द्राक्ष बागा या उशिरा काढण्यासाठी तयार होणार आहेत, उशिरा येणाऱ्या द्राक्ष बागांवर देखील अवकाळी मुळे रोगांचे सावट येऊ शकते.
नुकत्याच डिसेंबर महिन्यातील पहिल्याच आठवड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती तेव्हा देखील जिल्ह्यातील कांदा व द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले होते. आधीच अस्मानी संकटामुळे पुरता हतबल झालेला शेतकरी परत एकदा निसर्गाच्या अवकृपेमुळे संकटात सापडतांना दिसत आहे.
Published on: 09 January 2022, 01:01 IST