Pune News : बारामती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी पुण्यात लोकसभा निवडणुकीचा आज (दि.१८) अर्ज भरला आहे. तर त्याच्या विरोधात असणारे महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी देखील आजच लोकसभा उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे. यावेळी दोन्ही उमेदवारांच्या बाजूने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले आहे. यासोबतच महाविकास आघाडीचे पुण्याचे उमेदवार रविंद्र धंगेकर आणि शिरुर लोकसभेचे उमेदवार डॉ.अमोल कोल्हे यांनी देखील आपले अर्ज दाखल केले आहेत.
महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, ना.चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, खा.मेधा कुलकर्णी, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री विजयबापू शिवतारे, आ.भीमराव तापकीर, आ. दत्तामामा भरणे, आ. राहुल कुल, कांचन कुल, रमेशआप्पा थोरात, वासुदेव काळे, माजी खासदार प्रदीप रावत यांच्यासह अनेक आजी, माजी आमदार महायुतीतील सर्व घटक पक्षांचे जिल्हाध्यक्ष, नेते, पदाधिकारी उपस्थित होते.
तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी माजी मंत्री श्री.बाळासाहेब थोरात, माजी राज्यमंत्री विश्वजित कदम, आ.अशोकबापु पवार, आ.सचिन अहिर, आ.संजय जगताप, आ. संग्राम थोपटे, माजी आ. महादेव बाबर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र आणि अजित दादांचे पुतणे युगेंद्र पवार या सर्वांच्या विशेष उपस्थितीत दाखल केला.
बारामती लोकसभा निवडणुकीची देशात चर्चा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षात बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात फुट पडली. त्यानंतर ही होणारी निवडणूक म्हणजे लोकसभेची ही पहिलीच निवडणूक आहे. यामुळे येथे दोन पवार यांच्यामध्ये प्रामुख्याने ही लढत मानली जात आहे. याठिकाणी नंदन-भावजय अशी ही लोकसभेची निवडणूक लढवली जाणार आहे. यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून बारामती लोकसभेसाठी जोर लावला जात आहे.
अर्ज भरल्यानंतर सभेमधून एकमेकांवर वार
अर्ज भरल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले. यावेळी ते म्हणाले की, बारामतीत इतिहास घडणार आहे. आपल्या सुनबाई दिल्लीला जातील म्हणजे जातील. या निवडणुकीत आपल्यासोबत कांचन कूल पासून ते नवनाथ पडळकर देखील आहे. त्यामुळे आता फक्त बारामतीमध्ये मतदारांना मतदान केंद्रावर आणायचं आहे, अशा सूचनाही फडणवीसांनी यावेळी उपस्थित कार्यकत्यांना केल्या आहेत.
दरम्यान, अर्ज भरल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी देखील भाषण केले आहे. यावेळी त्या म्हणाल्या की, मला म्हणतात हे रडत बसतील. पण लक्षात ठेवा मी पण शारदाबाई पवारांची नात आहे मी रडणारी नाही. मला लढायला शिकवलं आहे, रडायला नाही, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.
Published on: 18 April 2024, 04:09 IST