News

वर्धा: जिल्ह्यात खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटपाचे १ हजार २९ कोटी रुपयांचे उद्दिष्ट असताना आतापर्यंत केवळ ३७ कोटी रुपये कर्ज वाटप झालेले आहे. कर्जमाफी मिळालेल्या सर्व शेतकऱ्यांना बँकांनी कर्ज वाटप करावे, यासाठी जिल्हाधिकारी यांनी आठवड्यातून दोनदा बँकांची बैठक घेऊन याचा पाठपुरावा करावा, अशा सूचना कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या.

Updated on 05 June, 2020 8:41 AM IST


वर्धा:
जिल्ह्यात खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटपाचे १ हजार २९ कोटी रुपयांचे उद्दिष्ट असताना आतापर्यंत केवळ ३७ कोटी रुपये कर्ज वाटप झालेले आहे. कर्जमाफी मिळालेल्या सर्व शेतकऱ्यांना बँकांनी कर्ज वाटप करावे, यासाठी जिल्हाधिकारी यांनी आठवड्यातून दोनदा बँकांची बैठक घेऊन याचा पाठपुरावा करावा, अशा सूचना कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या. नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयातून कृषीमंत्री यांनी नागपूर विभागातील ६ जिल्ह्यांचा खरीप हंगाम आढावा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतला त्यावेळी ते बोलत होते.

जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी शासनाच्या २२ मे च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने बँकांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून अद्याप आदेश प्राप्त झाले नाहीत. तसेच बँकांच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करणे आवश्यक आहे आणि त्याचे अधिकार शाखास्तरावर बँक व्यवस्थापकांना नाहीत. तसेच पीक कर्जाव्यतिरिक्त इतर कर्ज असले तरी सुद्धा बँक पीक कर्ज देण्यास नकार देत असल्याची बाब कृषी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.

याबाबत कालच मुख्यमंत्री यांची रिझर्व्ह बँकेसोबत बैठक झाली असून त्यामध्ये झालेले निर्णय आपल्यापर्यंत पोहोचतील. शासनाने महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेतील शिल्लक शेतकऱ्यांचे पीक कर्ज व्याजासह देण्याची हमी दिली आहे. त्यामुळे बँका यादीतील कर्जमाफीचा प्रत्यक्षात लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना सुद्धा पीक कर्ज उपलब्ध करून देतील यावर जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. बँका जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना कर्ज देत नसतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे, असेही श्री. भुसे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना खते व बियाणे बांधावर उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करावे. तसेच खते आणि बियाणे कुणीही चढ्या दराने विकणार नाही आणि यामध्ये काळाबाजार होणार नाही याची खबरदारी घ्यावी. शेती शाळेवर जास्त लक्ष द्यावे अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. पीएम किसान योजनेमध्ये वर्धा जिल्ह्याने चांगले काम केल्याबद्दल कृषीमंत्र्यांनी जिल्हाधिकारी यांचे अभिनंदन केले. वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४० हजार शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून १ लक्ष ३३ हजार ८६३ शेतकरी खातेधारकांच्या खात्यात पहिला हफ्ता जमा झाला आहे.

यावेळी जिल्हाधिकारी यांच्या सोबत जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे, उपविभागीय कृषी अधिकारी उपस्थित होते. तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे यांनी नागपूर येथे बैठकीत उपस्थित राहून जिल्ह्याची माहिती दिली.

English Summary: Banks should meet twice a week for crop loans
Published on: 05 June 2020, 08:38 IST