बँक ऑफ महाराष्ट्रातर्फे नैसर्गिक आपत्ती व इतर बाह्य कारणांमुळे झालेले शेतीचे नुकसान याचा विचार करून शेतकऱ्यांसाठी एकरकमी परतफेड योजना आणली आहे. या योजनेनुसार ज्या शेतकरी कर्जदारांचे शेती कर्ज ३१ मार्च २०२० रोजी नैसर्गिक आपत्ती व इतर बाह्य कारणांमुळे अनुत्पादक झालेली आहेत व ज्यांच्याकडे १० लाखांपर्यंत कर्ज बाकी येणे आहे, अशी सर्व कर्ज खाती या योजनेसाठी पात्र आहेत.
कुठल्याही ओटीएस योजनेअंतर्गत लाभ घेतलेले कर्जदार साधारणत: त्या बँकेकडून पुनश्च लाभ घेण्यास अपात्र असतात. परंतु या विशेष ओटीएस योजनेअंतर्गत दहा लाखांपर्यंत कर्जबाकी असणारे सर्व शेतकरी पुन्हा बँक ऑफ महाराष्ट्राकडून कर्ज मिळवण्यास पात्र आहेत, हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे. या योजनेअंतर्गत संचित व्याज पूर्णपणे माफ केले जाणार असून, कर्ज बाकीवर आकर्षक सूट दिली जाणार आहे.
दरम्यान, ज्या शेतकऱ्यांनी गृह कर्ज, वाहन कर्ज इत्यादी घेतली आहेत, त्यावर देखील बँकेच्या नियमानुसार सूट दिली जाईल. तरी सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सोलापूरच्या झोनच्या व्यवस्थापक सुनीता भोसले व हेमंत महाजन यांनी केले आहे.
Published on: 24 February 2021, 07:16 IST