केळीचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खानदेशातून आनंदाची बातमी समोर येत आहे. धुळे जिल्ह्यातील एका केळी उत्पादक शेतकऱ्याला सर्वाधिक दर मिळाल्याचे वृत्त समोर आले आहे, यामुळे केळी उत्पादक शेतकर्यांच्या आशा पल्लवीत झाल्याचे चित्र या वेळी बघायला मिळाले. गेल्या अनेक दिवसांपासून केळीच्या बाजार भावात मोठी घसरण बघायला मिळत होती, आता या घसरणीला ब्रेक लागून केळीचे भाव वाढत असल्याचे सांगितले जात आहे. यावल तालुक्यातील सातोद येथील केळी उत्पादक शेतकऱ्यास शुक्रवारी जिल्ह्यातील उच्चांकी दर प्राप्त झाला. हाती आलेल्या माहितीनुसार, या शेतकऱ्याच्या केळीला 1635 रुपये प्रति क्विंटल एवढा उच्चांकी दर मिळाला हा दर जिल्ह्याचा सर्वाधिक दर असल्याचे सांगितले जात आहे.
यावल तालुक्यातील मौजे सातोद येथील रहिवासी केळी उत्पादक शेतकरी लोकेश तळेले गेल्या अनेक वर्षांपासून केळीचे उत्पादन घेत आहेत. या ही वर्षी त्यांनी केळीचे यशस्वी उत्पादन घेतले आहे. लोकेश यांच्या केळीला शुक्रवारी बाजारपेठेत जिल्ह्यात सर्वाधिक दर मिळाला. शुक्रवारी या प्रगत शेतकऱ्यांच्या शेतातून सुमारे 164 क्विंटल केळीची काढणी करण्यात आली. काढणी केलेल्या केळीचा प्रत्येक गढ जवळपास 30 किलो वजनी असल्याचे सांगितले गेले. बाजार समितीकडून केळीसाठी 940 रुपये प्रति क्विंटल असा दर ठरविण्यात आला होता. असे असले तरी लोकेश यांची केळी ही एक्सपोर्ट कॉलिटीची होती, त्यामुळे त्यांच्या केळीला जाहीर दरापेक्षा दुपटीने दर मिळाल्याचे समजत आहे. लोकेश यांच्याजवळ सध्या 9000 केळीची झाडे आहेत, शुक्रवारी लिलाव झालेली केळी जम्मू-काश्मीर रवाना करण्यात आली.
लोकेश यांची केळी याआधी देखील अनेक वेळा विदेशात एक्सपोर्ट झाली आहे, लोकेश यांच्या मते, युरोप, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, दुबई यांसारख्या देशांत त्यांची मोठ्या प्रमाणात केळी निर्यात झाली आहे. लोकेश सांगतात की, त्यांची केळी ही विदाऊट चिलिंग आहे आणि म्हणूनच केळीचा दर्जा हा उत्तम असतो आणि त्यामुळे याची मागणी देशांतर्गत नव्हे नव्हे तर विदेशातही मोठ्या प्रमाणात असल्याचे समजते. लोकेश यांच्या केळीला जिल्ह्यातून सर्वाधिक दर मिळायला देखील हेच कारण होते.
लोकेश यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, या हंगामात स्थानिक व्यापाऱ्यांच्या माध्यमातून त्यांनी जवळपास 14 ट्रक केळी काढणी केली असून बाजारपेठेत विक्रीस पाठवली आहे. शुक्रवारी मिळालेल्या उच्चांकी दराबाबत देखील लोकेश यांनी समाधान व्यक्त केले. तसेच आगामी काही दिवसात केळीचे दर वाढण्याची देखील शक्यता असल्याचे म्हटले.
Published on: 13 February 2022, 12:29 IST