शेतकरी आत्महत्या! देशातील एक ज्वलंत मुद्दा. ह्या मुद्द्याच्या जोरावर राजकारणी लोक आपली रोटी हि शकत असतात. पण शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी कुणीच प्रयत्न केले नाहीत किंवा प्रयत्न केलेत पण यश काही आले नाही. देशात सर्वात जास्त आत्महत्या ह्या आपल्या महाराष्ट्रात केल्या जातात. शेतमालाला मिळणारा कवडीमोल भाव, सरकारचे संवेदनहिन धोरण, सावकारी तसेच बँकिंग कर्ज ह्या सर्व गोष्टी शेतकऱ्यांना टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडतात आणि शेतकरी आपले जीवन संपवतात.
शेतीमधून वाजवी उत्पन्न मिळत नसल्याने शेतकरी पुरता चिंतेत सापडला आहे, शेतकऱ्याला त्यामुळे दुसरा कुठलाच पर्याय दिसत नाही आणि तो आत्महत्या करण्यासाठी मजबूर होतो. सरकारे तसेच वेगवेगळ्या रिसर्च करणाऱ्या संस्था दावा करतात की, शेतीमध्ये प्रगती होत आहे, पिकाचे उत्पादन हे वाढले आहे तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न हे देखील वाढले आहे परंतु जमिनीवर वास्तविकता हि काहीशी वेगळी आहे. जर खरंच शेतकऱ्यांचे उत्पन्न हे वाढलेले असते आणि तो समाधानी असता तर त्याने आत्महत्या केळीच नसती. पण शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासाठी प्रतिबंधित करणे, त्यांना आत्महत्या करणे हा काही उपाय नाही हे समजावणे, त्यांना जीवन जगण्यासाठी मोटिवेट करणे हे गरजेचे आहे.
महाराष्ट्रातील वाढती आत्महत्या हा चिंतेचा विषय आहे आणि हिच चिंता महाराष्ट्रातील एका नवजवान शेतकऱ्याला भेडसावत होती आणि म्हणुनच शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यापासून रोखण्यासाठी ह्या अवलिया शेतकऱ्याने जनजागृती मोहीम चालू केली आहे. हा अवलिया शेतकरी गावागावात जाऊन शेतकऱ्यांना समजावत आहे तसेच राज्यातील सर्व जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याला निवेदन करत आहे की, शेतकरी आत्महत्याचे मूळ कारण शोधले जावे.
तसेच हा युवक शेतकरी शेतकरी आत्महत्याचे समाधान काढले जावे तसेच शेतकऱ्यांचे मार्गदर्शन करण्यात यावे म्हणून कलेक्टरकडे अपील देखील करत आहे. हे धाडशी आणि कौतुकास्पद काम करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे बाळासाहेब कोळसे. बाळासाहेबांनी आतापर्यंत 1800 किलोमीटरचा प्रवास केला आहे व जनजागृती केली आहे. ह्या युवक शेतकऱ्याने आतापर्यंत 16 कलेक्टरांना निवेदन दिले आहे. हा युवक शेतकरी पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील आडगाव येथील रहिवाशी आहे.
काय आहे बाळासाहेबांचा उद्देश
बाळासाहेब कोळसे हे स्वतः शेतकरी आहेत, त्यांच्या मते, त्यांना शेती करतांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. कमी होणारे उत्पादन हि देखील एक प्रमुख समस्या आहे.
बाळासाहेब सांगतात की, जर एखाद्या वर्षी उत्पादन चांगलेच मिळाले तर त्याला बाजारभाव चांगला मिळणार नाही यामुळे ह्या सर्व परिस्थितीला कंटाळून शेतकरी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतो. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या बाळासाहेबांच्या काळजाला भिडत होत्या म्हणुन त्यांनी शेवटी हा जनजागृतीचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा उचित मोबदला दिला जावा, तसेच शासनाने शेतकरी आत्महत्या वाढण्याचे कारण शोधावे आणि त्यावर उपाययोजना करावी अशी मागणी बाळासाहेब करत आहेत. हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन बाळासाहेब ह्या सत्कार्याकडे वळलेत. बाळासाहेब अजून 20 जिल्ह्यात जनजागृती करणार आहेत तसेच ते महामहिम राज्यपाल आणि मुख्यमंत्रीची भेट घेणार आहेत आणि त्यांना देखील निवेदन देणार आहेत.
Published on: 23 November 2021, 03:51 IST