जर आपण अटल पेन्शनधारक असाल तर ही बातमी आपल्यासाठी आहे. एक जुलै म्हणजेच उद्यापासून सरकार या योजनेत बदल करू इच्छित आहे. उद्यापासून अटल पेन्शन योजनेतील खात्यांमधून मासिक योगदान आपोआप कापले जाणार आहे. पेन्शन फंड नियामक विकास प्राधिकरणाने बँकांना अटल पेन्शन योजनेच्या ऑटो डेबिट ३० जूनपर्यंत थांबविण्याचे निर्देश दिले होते. आता परत ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे एप्रिल महिन्यात ऑटो डेबिट करण्याचा थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या योजनेचा लाभ घेणारे लाभार्थी हे मध्यम आणि सामान्य गटातील आहेत. मार्च महिन्यापासून देशात कोरोनाचे संकट आले आहे. या संकटाच्या वेळी नागरिकांच्या हाती पैसा राहावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता.
पीएफआरडीएच्या अलीकडील अधिसूचनेमध्ये असे म्हटले आहे की जर ग्राहकांच्या पेन्शन योजनेचे खाते ३० सप्टेंबर २०२० पूर्वी नियमित केले असेल तर त्या लाभार्थ्यांना व्याजावरील दंड आकराला जाणार नाही. बऱ्याच वेळेस जर हप्त्यासाठी उशिर झाला तर बँक दंड वसूल करत असते. अटल पेन्शन योजनेच्या अधिकृत संकेतस्थळानुसार, १०० रुपये प्रति महिन्यापर्यंत १ रुपये प्रति महिना दंड आकरला जातो.
यासह १०१ रुपये आणि ५०० रुपये दरम्यान दोन रुपये प्रति महिना दंड असतो. ५०१ रुपये आणि १००० रुपयांच्या दरम्यान पाच रुपये प्रति महिना दंड असतो. तर १००१ रुपयांच्या पलीकडील हप्त्यासाठी १० रुपये प्रति महिना दंड असतो. दरम्यान अटल पेन्शन योजनेची सुरुवात ही सामान्य जनतेच्या हितासाठी सुरु केली होती. या योजनेतून त्यांना भविष्यात आर्थिक साहाय्यता मिळेल या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली होती. यात १८ ते ४० वयातील भारतीय नागरिक योगदान करु शकतो, म्हणजेच या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
Published on: 30 June 2020, 05:55 IST