स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली 23 नोव्हेंबर रोजी कोल्हापुरात पुणे - बंगळूर महामार्गावर करण्यात येणाऱ्या बेमुदत चक्काजाम आंदोलना अखेर यश आलं आहे. 9 तासांनंतर या आंदोलनाची कोंडी फुटली. गेल्या हंगामात तोड झालेल्या ऊसाला ज्या कारखान्यांनी तीन हजार पेक्षा कमी दर दिला, त्यांनी प्रतिटनास किमान १०० रुपये. तर ज्या कारखान्यांनी तीन हजार रुपये दर दिला, त्यांनी आणखी ५० रुपये देण्याची तयारी कारखानदारांनी दाखवल्या नंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
गेल्या गळीत हंगामातील प्रतिटन उसाचा ४०० रुपयांचा दुसरा हप्ता, तसेच यावर्षीच्या प्रतिटन उसाला ३५०० रुपये दर द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मागील दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू होते. गेल्या दोन महिन्यांमध्ये पदयात्रा , ठिय्या आंदोलन करण्यात येवूनही ऊस प्रश्नी तोडगा न निघाल्याने बेमुदत चक्काजाम आंदोलन करण्यात आले. मात्र काल सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत झालेल्या बैठकीत साखर कारखानदारांनी मागणी मान्य केल्याने अखेर यावर तोडगा निघाला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी आणि साखर कारखांनदार यांच्यात बैठक झाली. या बैठकीत मागील हंगामात ज्या कारखान्यांनी तीन हजारांच्या आत दर दिला, त्यांनी १०० रुपये. तर ३००० पेक्षा जास्त दर देणाऱ्या कारखान्यांनी मागील हंगामातील ५० रुपये देण्याचा प्रस्ताव एकमताने मान्य करण्यात आला. मात्र गेल्यावर्षीच्या उसासाठी प्रतिटन शंभर व पन्नास रुपये देण्यासाठी सर्व कारखान्यांकडून सहमती पत्र घेतले जाणार आहे. जोपर्यंत हे सहमतीचे पत्र देत नाहीत, तोपर्यंत साखर कारखाने सुरू करू दिले जाणार नाहीत, असा इशारा राजु शेट्टी यांनी दिला आहे.
Published on: 24 November 2023, 02:52 IST