मुंबई: अर्जेंटिना महाराष्ट्राशी करार करून कृषी क्षेत्रात सहकार्य करण्यास तयार असल्याचे आश्वासन, अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष मोरिसिओ मॅक्री यांनी आज येथे दिले. राजभवन येथे राज्यपाल चे. विद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मॅक्री यांचे स्वागत केले, त्यानंतर त्यांचेसमवेत झालेल्या भेटीमध्ये मोरिसिओ मॅक्री यांनी हे आश्वासन दिले. अर्जेंटिना महाराष्ट्रात एक व्यापारी शिष्टमंडळ पाठवून अन्नधान्य साठवणुकीसाठी अर्जेंटिनाच्या प्रसिद्ध सायलो बॅग व इतर तंत्रज्ञान देण्याबाबत चर्चा करेल असे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारसोबत झालेल्या विविध करारांबाबत माहिती देऊन दहशतवादाविरोधी लढ्यामध्ये आपला देश भारतासोबत कार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
भारतासोबत राजनैतिक संबंध प्रस्थापित होण्याला 70 वर्षे पूर्ण होत असताना महाराष्ट्राला भेट दिल्याबद्दल राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी मॅक्री यांचे आभार मानले. अर्जेंटिनाचे कृषी विकासात सहकार्य लाभल्यास भारताला शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास निश्चितपणे मदत होईल, असे राज्यपालांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात सुरु असलेल्या मेट्रो रेल्वे प्रकल्प, कोस्टल रोड व इतर पायाभूत प्रकल्पांबाबत अर्जेंटिनाच्या शिष्टमंडळाला माहिती दिली.
Published on: 20 February 2019, 08:54 IST