मुंबई: डिंभे डाव्या तीर कालव्यातील गळती रोखण्यासाठी व कालव्यातील पाण्याचा शेतकऱ्यांना पुरेपूर वापर फायदा व्हावा, यासाठी डिंभे डाव्या तीर कालव्यास पर्याय म्हणून डिंभे धरणाचे पाणी माणिकडोह धरणात सोडण्यासाठी 16.10 कमी लांबीच्या जोड बोगद्याच्या कामास महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळाच्या नियामक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. जलसंधारण मंत्री तथा अहमदनगरचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी पाठपुरावा केल्यामुळे दुष्काळी भागातील कर्जत, श्रीगोंदा, पारनेर व करमाळा या तालुक्यांना या पाण्याचा फायदा होणार आहे. जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, राज्यमंत्री विजय शिवतारे, महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानगुडे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
कुकडी प्रकल्पांतर्गत डिंभे धरणातून डिंभे डाव्या कालव्याद्वारे येडगाव धरणात पाणी सोडण्यात येते. कुकडी डाव्या कालव्याद्वारे हे पाणी जुन्नर, कर्जत, श्रीगोंदा, पारनेर व करमाळा या तालुक्यातील क्षेत्रांना देण्यात येते. मात्र, डिंभे डाव्या कालव्यातील विसर्ग क्षमता कमी असल्यामुळे तसेच या कालव्यातून मोठ्या प्रमाणात गळती होत असल्यामुळे 2.5 अब्ज घनफूट पाणी वाया जात होते. त्यामुळे येडगाव धरणात प्रत्यक्ष कमी विसर्ग मिळत असल्यामुळे कुकडी डावा कालव्याच्या आवर्तनावर याचा परिणाम होऊन विस्कळीतपणा येत होता.
याबद्दल प्रा.राम शिंदे यांनी डिंभे ते माणिकडोह दरम्यान जोड बोगद्याद्वारे पाणी पोहोचविण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्याला यश येऊन महामंडळाने जोड बोगद्याचे काम ईपीसी पद्धतीने करण्यास व निविदा कार्यवाही सुरू करण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे कुकडी कालव्यातील आर्वतनामुळे येणारा विस्कळीतपणा कमी होऊन गळतीमुळे वाया जाणारे पाणी वापरण्यास मिळणार आहे. दुष्काळग्रस्त भागातील कर्जत, श्रीगोंदा, पारनेर, करमाळा या तालुक्यांना याचा फायदा होणार आहे.
Published on: 14 February 2019, 07:05 IST