मुंबई : त्या 19 तरुणांनी दोन-तीन वर्षे अभ्यास करून कृषी सेवक पदाची परीक्षा दिली. परंतु कोविड च्या साथीमुळे परीक्षा, निकाल आणि नियुक्ती प्रक्रिया रखडली. या दरम्यान झालेल्या विलंबामुळे निवडसूची वैधता कालावधी संपल्याचे तांत्रिक निमित्त बनले आणि या मुलांचे करिअर संकटात सापडले. परंतु कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी या तरुणांच्या करिअरबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून घेतलेल्या निर्णयामुळे या 19 तरुणांच्या करिअरला पुन्हा नवे वळण मिळाले व या तरुणांना अखेर शासकीय सेवेत नियुक्ती मिळाली.
राज्य शासनाच्या कृषी विभागाने 313 कृषी सेवक पदांच्या भरतीसाठी प्रक्रिया सुरू केली. त्यामध्ये राज्यभरातून सव्वा लाख अर्ज प्राप्त झाले होते. सन 2019 मध्ये परीक्षा घेण्यात आल्या व 2020 मध्ये निकाल जाहीर करण्यात आला.
निकालात उत्तीर्ण उमेदवारांनी काही कारणामुळे नियुक्ती स्वीकारली नाही किंवा विशिष्ट प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध झाले नाहीत, तर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी दिली जाते. अशा 19 उमेदवारांना कृषी सेवक पदी नियुक्तीची संधी मिळाली. परंतु याच दरम्यान कोविडची साथ आल्यामुळे जग ठप्प झाले. सन 2020 ते 21 या कालावधीत कोविड साथीमुळे सदर कृषी सेवक भरती प्रक्रियेतील उमेदवारांना नियुक्ती देण्याचे काम सुद्धा रखडले.
निकालाच्या दिनांकापासून एक वर्षात नियुक्ती देणे बंधनकारक होते. मात्र कोविड महामारीमुळे नियुक्ती देण्याबाबतच्या प्रस्तावास उशीर झाल्याने निवड सूची वैधता कालावधी संपुष्टात आला. त्यामुळे या 19 तरुणांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात दाद मागितली. त्यावर न्यायाधिकरणाने संबंधित उमेदवारांना गुणवत्तेनुसार नियुक्ती देण्यासंदर्भात शासनाने निर्णय घ्यावा, असे आदेश 2021 च्या अखेरीला दिले. त्यानुसार या 19 तरुणांनी नियुक्तीच्या निर्णयासाठी शासनाचे दार ठोठावले.
कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी 15 जुलै 2023 रोजी पदभार स्वीकारला. त्यानंतर ताबडतोब या मुलांना न्याय देण्याची प्रक्रिया सुरू केली. अखेर या तरुणांना कृषी सेवक पदावर नियुक्ती देण्यात आली. याबद्दल या तरुणांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले आहे.
Published on: 13 November 2023, 10:17 IST